Bhandara Crime : अल्पवयीन विवाहिता सहा महिन्यांची गर्भवती, पतीसह माहेर आणि सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल
Bhanadara Crime : भंडारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. इतकंच नाही तर ती सहा महिन्यांची गर्भवती सुद्धा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी माहेर आणि सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Bhanadara Crime : बालविवाहासह (Child Marriage) अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी शासकीय आणि सामाजिक पातळीवर विशेष प्रयत्न होत असताना अजूनही हा प्रकार थांबलेला नाही, याची प्रचिती भंडारा (Bhandara) जिल्ह्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. इतकंच नाही तर ती सहा महिन्यांची गर्भवती (Pregnant) सुद्धा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ग्रामसेवकाच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिसात माहेर आणि सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कागदपत्रांची तपासणी करताना मुलीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचं उघड
विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करताना ही मुलगी 18 वर्षापेक्षा कमी वयाची असल्याचं ग्रामसेवक नेपाल दशरख गोटेफोडे यांच्या लक्षात आलं. लग्नाच्या वेळी मुलीचे वय 17 वर्षे 3 महिने 5 दिवस होतं. असं असतानाही आई वडिलांनी तिचा विवाह गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी इथल्या युवकासोबत फेब्रुवारी 2022 रोजी लावून दिला. तसंच मुलगी सज्ञान नाही ही बाब माहेर आणि सासरकडील लोकांना माहित असतानाही त्यांनी कायद्याचे उल्लंघन केलं. लग्नानंतर ही मुलगी 6 महिन्याची गर्भवती सुद्धा आहे.
ग्रामसेवकाची पोलिसात तक्रार; पतीसह माहेर आणि सासरकडील लोकांवर गुन्हा
यानंतर ग्रामसेवक गोटेफोडे यांनी याबाबत लाखनी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी मुलीच्या पतीसह माहेर आणि सासरच्या लोकांवर लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ग्रामसेवक नेपाल दशरथ गोटेफोडे यांच्या फिर्यादीवरुन लाखनी पोलिसांनी कलम 376 (2) (एन) 376 (2) (जे) 34 भा.द.वि. सह कलम 4, 6, बाललैंगिक अत्याचार अधिनियम, बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये मुलीचे आई आणि वडील तसेच पती हितेश राजेश वासनिक (वय 24 वर्षे) आणि सासू, सासरे यांच्यासह इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लाखनी पोलीस करत आहे.
पुरोगामी परंपरा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात बालविवाहाचे वाढते प्रमाण.
दुसरीकडे पुरोगामी परंपरा असलेल्या कोल्हापुरात बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे. "गावात बालविवाह झाल्यास सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई केली जाईल," असे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी काढले होते. मात्र त्यानंतरही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालविवाह प्रमाण वाढलं आहे. मे 2022 पर्यंत जिल्ह्यात 19 बालविवाह झाल्याची माहिती पुढे आली आहे. नुकतंच कोल्हापूरच्या दऱ्याचे वडगाव याठिकाणी 14 वर्षीय मुलगी गरोदर राहिल्याने बालविवाह झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार, शिवाय पुरोगामी जिल्ह्यात असे चित्र असेल तर इतर जिल्ह्यातील परिस्थिती कशी असणार हा प्रश्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
