Badlapur School: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील पोलिसांच्या चुकीच्या FIR मुळे आरोपीला फायदा, असीम सरोदेंचा गंभीर आरोप
Badlapur Crime: पीडित मुलीचा जबाब बाल मानसोपचार तज्ज्ञाने नोंदवला पाहिजे होता. असीम सरोदेंचा बदलापूर पोलिसांवर गंभीर आरोप. ज्या माणसाने अत्याचार केला मुलींवर तो गतिमंद आहे, असे सांगणे असंवेदशील आहे.
कल्याण: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून अनेक त्रुटी राहिल्या असून पोलिसांनी हा संपूर्ण तपास असंवेदनशील पद्धतीने केल्याचा आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला. याप्रकरणी मी पीडित मुलींच्या बाजूने वकीलपत्र दाखल केले आहे. कल्याण कोर्टातील 15 ते 20 वकिलांनी पीडित मुलींना मोफत मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात पीडित मुलींना न्याय मिळावा, अशी भावना आहे. मी त्यामध्ये काय अडथळे आहेत, हे समजून घेण्यासाठी इकडे आलो होतो. पण मला कोर्टात आल्यावर पोलिसांचा तपास पाहून धक्का बसल्याचे असीम सरोदे यांनी सांगितले. ते सोमवारी कल्याण कोर्टाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी असीम सरोदे यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणातील पोलीस तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. त्यांनी सांगितले की, पीडित मुलींच्या कायदेशीर मदतीसाठी पुढे आलेले वकील सांगतात की, पोलिसांनी याप्रकरणात चुकीची कलमं लावली आहेत. पोलिसांनी अपुरी कलमं लावून FIR दाखल केला. पोलिसांनी पुरेशी माहिती न घेतल्यामुळे हे घडले. त्यांनी पीडित मुलींच्या पालकांचे म्हणणे नीट ऐकून घेतले नाही. ही परिस्थिती विदारक आहे. वकिलांनी आग्रह केल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्रात कलम 6 चा अंतर्भाव केला. आता वकिलांनी पॉक्सोचे सेक्शन 9 लावण्याची मागणी केली आहे, तेदेखील लावले जाईल. पोलीस FIRमध्ये नवीन कलमं लावली जात आहेत. ते पाहता लक्षात येत आहे की, पोलिसांनी नीट तपास केला नाही. असंवेदनशील पद्धतीने, पुरेशा माहितीअभावी तपास करुन FIR दाखल केला. हे कायदेशीर कमजोरीचे लक्षण आहे. पीडित मुलींना न्याय मिळाला नाही तर त्यासाठी पोलिसांनी दाखल केलेला चुकीचा FIR कारणीभूत आहे. पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असा आरोप असीम सरोदे यांनी केला.
मुलींवरील अत्याचारापेक्षा शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे का?
हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर अनेकांना शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत आहे. शाळा सुरु राहणे गरजेचे आहे, असे अनेकजण बोलत आहेत. पण मुलींवरील लैंगिक अत्याचारापेक्षा शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे का? ज्या सफाई कर्मचाऱ्याने मुलींवर अत्याचार केला, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्याने काय केलं, हे त्याला स्वत:ला माहिती नसल्याचेही म्हटले जात आहे. पोलिसांनी अशा पद्धतीने माहिती देणे हे असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे. आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न चुकीचे आहेत. मी त्यादृष्टीने न्यायालयात युक्तिवाद करेन. मुलगी शाळेत असताना तिच्यावर बलात्कार झाला. बोटाच्या साहाय्याने तिच्यावर अत्याचार झाला. त्या लहान मुलीला का झाले, हे सांगता येत नाही, तेव्हा हा गुन्हा आणखी गंभीर ठरतो. अशावेळेस पोलिसांनी सेक्शन 6 आणि सेक्शन 9 लावण्याची गरज होती. मी न्यायालयात युक्तिवाद करताना ही गोष्ट मांडेन, असे असीम सरोदे यांनी सांगितले.
आणखी वाचा
बदलापूरच्या शाळेतील 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब, दीपक केसरकरांची धक्कादायक माहिती