(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Badaun gangrape case | अंगणवाडी सेविकेवर सामूहिक बलात्कार करत हत्या; मुख्य आरोपी अटकेत
गेल्या रविवारी बदायू जिल्ह्यातील उघैती पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका गावात मंदिरात गेलेल्या एका 50 वर्षीय महिलेचा संशयितरित्या मृत्यू झाला होता. महिलेच्या कुटुंबियांनी मंदिरातील पुजारी सत्य नारायण आणि त्याच्या दोन साथीदारांवर बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला होता.
बदायूं : उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात आंगणवाडीत काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीतर, तर बलात्कारानंतर महिलेची हत्याही करण्यात आली. बदायूंमधील या बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती, उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी प्रशांत कुमार यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, "गुरुवारी मध्यरात्री महंत सत्य नारायणला उघैती पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या एका घरातून या प्रकरणातील मुख्य आरोपी महंताला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत."
दरम्यान, गेल्या रविवारी बदायू जिल्ह्यातील उघैती पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका गावात मंदिरात गेलेल्या एका 50 वर्षीय महिलेचा संशयितरित्या मृत्यू झाला होता. महिलेच्या कुटुंबियांनी मंदिरातील पुजारी सत्य नारायण आणि त्याच्या दोन साथीदारांवर बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला होता. या आधारावर आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. मंगळवारी रात्री वेद राम आणि जसपाल या दोघांना अटक करण्यात आली होती. मंदिरातील पुजारी सत्य नारायण तेव्हापासूनच फरार होता. त्याला अटक करण्यासाठी पोलीसांची चार पथकं तैनात करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बदायूमध्ये घडलेली घटना गांभीर्यानं घेत बरेली झोनचे अप्पर पोलीस महानिर्देशकांकडून घटनेची माहिती घेतली. तसेच मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून गरज पडल्यास तपासासाठी विशेष दलाचीही मदत घेण्यात यावी, असंही सांगितलं आहे. तसेच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आणि याप्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात यावी, असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशात महिलेवर बलात्कार करत तिची हत्या
उत्तर प्रदेशात बदायूंमध्ये एका महिलेवर अत्यंत क्रूर पद्धतीने सामूहिक बलात्कार करुन, तिची हत्या करण्यात आली. 3 जानेवारी रोजी महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मात्र, परत घरी आलीच नाही. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या गुप्तांगात जखमा आढळून आल्या. या अत्याचारात पीडित महिलेचा पायही मोडला. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाला असून, एका पुजाऱ्याने तिचा मृतदेह घरी आणल्याचं पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं. महिलेच्या मुलाने दिलेल्या माहिती प्रमाणे, मंदिरातील पुजारी आणि इतर दोघांनी पीडितेचा मृतदेह तिच्या घरी आणून ठेवला. त्यांच्याकडे चौकशी करण्यापूर्वीच ते निघून गेले, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.