Baba Siddique : दुचाकीवरून यायचं आणि गोळ्या घालायचा होता प्लॅन, पण अपघात झाल्याने ऐनवेळी बदल; बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात उलगडा
Baba Siddique Murder Case : दुचाकीवरून रेकी करायला गेलेल्या आरोपींचा अपघात झाला आणि प्लॅनमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर दुचाकीवरून येऊन हल्ला करण्याचा प्लॅन आरोपींचा होता. पण रेकी करायला गेल्यावर दुचाकीचा अपघात झाल्याने दुचाकी न वापरण्याचा निर्णय आरोपींनी घेतला असल्याची माहिती पोलिस तपासातून उघड झाली आहे. सिद्दीकींवर हल्ला करण्याआधी आरोपी स्पॉटवर पाऊणतास आधी येऊन उभे होते असंही पोलिस तपासात उघड झालं आहे.
बाबा सिद्धीकी यांच्यावर हल्ला करण्याआधी आरोपी दुचाकीहून स्पॉटची रेकी करायचे. दसऱ्याच्या दिवशीही बाबा सिद्दीकींवर दुचाकीवरूनच हल्ला करण्याचं ठरलं होतं. मात्र दुचाकीवरून रेकी करताना अपघात झाला आणि सिद्दीकींवर हल्ला करण्यासाठी दुचाकी न वापरण्याचा निर्णय आरोपींनी घेतला.
हल्ला करण्यापूर्वी पाऊणतास आधी येऊन घटनास्थळी उभे होते. आरोपी स्वत:सोबत एक शर्टही घेऊन आले होते. जेणेकरून हल्ला केल्यानंतर ओळख लपवण्यासाठी त्याचा वापर केला जाणार होता. बाबा सिद्दीकींवर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी 32 हजारात पुण्यातून दुचाकी विकत घेतली होती. वांद्रे येथे मिळालेल्या काळ्या बॅगेत पिस्तुल, एक आधार कार्ड आणि शर्ट होते.
या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम लोणकर हा हल्ला करण्यापूर्वीच घरातून फरार झाला होता.
लॉरेन्स बिश्नोईच्या कोठडीसाठी मुंबई पोलिसांचे प्रयत्न
लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगनं यापूर्वी 14 एप्रिल 2024 ला सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ऑगस्ट 2023 च्या सीआरपीसी कोडच्या सेक्शन 268 नुसार बिश्नोईला साबरमती तुरुंगाबाहेर कोणत्याही कारणासाठी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी एकदा लॉरेन्स बिश्नोईची कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईच्या कोठडीसाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आहे.
शुटर्सकडून बाईकवरून मुंबईत रेकी
कुर्लामधील भाड्याचे घर घेताना शिवकुमार गौतमने त्याचे खरे कागदपत्रे दिले होते. घर मालकाची गुन्हे शाखेच्या कक्ष 9 अंतर्गत चौकशी सुरू आहे. हरिशकुमारने पुण्यात 60 हजार रुपयात बाईक खरेदी केली. याच बाईकने पुण्यातून मुंबईत आला. रेकीसाठी ही बाईक शिवकुमारकडे दिली. पुढे शुटर्सकडून याच बाईकवरून मुंबईत रेकी करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बाबा सिद्दिकी हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांच्या रूममध्ये राहणाऱ्यांना तरुणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यातील वारजे परिसरात असलेल्या रूममधून गुल्लू आणि मोनू या 2 जणांना ताब्यात घेतलं आहे.
ही बातमी वाचा :