(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Baba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू, अज्ञात व्यक्तींनी चार ते पाच गोळ्या झाडल्या
Baba Siddique Shot Dead : आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच ही घटना घडली आहे. तोंडाला रुमाल बांधून तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून दोघांना अटक केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी आली होती धमकी
बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. पंधरा दिवासांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. आता त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. लिलावती रुग्णालयाच्या परिसरात आणि वांद्रे पूर्व परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू झाला आहे.
बाबा सिद्दिकी हे वांद्रे पूर्व परिसरातील बडे नेते असून त्यांनी राज्याचे मंत्री म्हणूनही काम केलं आहे. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून आमदार आहेत. लोकसभेच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
कोण आहेत बाबा सिद्दिकी?
झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दिकी हे मुंबईतील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत.
बाबा सिद्दिकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दिकी यांची नियुक्तीही केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.
लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्वमधून आमदार आहेत.