छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न; पोलिसांत गुन्हा दाखल; शहरात एकच खळबळ
Religious Conversion : एका महाविद्यालयीन तरुणाने दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा हा आरोप आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरात अल्पवयीन मुलांचे धर्मांतर (Religious Conversion) करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिसांत (Police) गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सुदानमधून शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात आलेल्या एका महाविद्यालयीन तरुणाने दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा हा आरोप आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तरुणाला सिटीचौक पोलिसांनी अटक केली असून, ओसामा अली युसूफ अहेमद (वय 23 वर्षे, रा. सुदान, उत्तर आफ्रिका, ह.मु. शिव छत्रपतीनगर, हडको, छत्रपती संभाजीनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शिव छत्रपतीनगर, हडको येथील 15 वर्षीय वीरेंद्र (नाव काल्पनिक) दहावीत शिकतो. 21 डिसेंबरला रात्री 9 वाजता तो जेवण करून गल्लीत फिरण्यासाठी बाहेर पडला. तेव्हा त्याचा मित्र देवेंद्र (नाव काल्पनिक) त्याला भेटला. दोघेही गप्पा मारत थांबले असता, बाजुच्या एका घराच्या गॅलरीतून आरोपी ओसामाने त्यांना वर बोलावले. त्यामुळे दोघेही घरात गेल्यावर ओसामाने आतून दरवाजाची कडी लावून घेतली. त्यांना समोर बसण्यास भाग पाडून एका कागदावर तो काहीतरी लिहायला लागला. तोच कागद जाळून धूर वीरेंद्र आणि देवेंद्रच्या तोंडावर सोडत होता. त्यांना इस्लाम धर्माबाबत माहिती सांगून बळजबरी धर्मांतर करण्याचा प्रयत्न तो करू लागला. तसेच, तो जे बोलेल ते शब्द म्हणायला भाग पाडू लागला. त्याला नकार देताच आरोपीने घरातील वस्तू मुलांच्या दिशेने फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घाबरलेल्या वीरेंद्र व देवेंद्रने स्वतःची कशीबशी सुटका करून घेत तेथून पळ काढला.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी
आरोपी ओसामाने खोलीत बोलवून दोन्ही तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अचानक घडलेल्या या प्रकाराने दोन्ही तरुण प्रचंड घाबरून गेले. त्यानंतर त्यांनी स्वतःची कशीबशी सुटका करून घेत तेथून पळ काढला. बाहेर आलेल्या दोघांपैकी वीरेंद्रने हा प्रकार पालकांना सांगितला. त्याच्या पालकांनी तत्काळ डायल 112 वर कॉल करून मुलांचे बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी ओसामाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत आरोपीला अटक केली. या प्रकरणी आरोपी ओसामाविरुद्ध सिटी चौक ठाण्यात वेगवेगळ्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तपास अधिकारी सहायक निरीक्षक शिवाजी चौरे यांनी 22 डिसेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. पाटील यांनी त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Love Jihad Committee : 'लव्ह जिहाद' समिती रद्द करा, सपा आमदाराची मागणी