Delhi Crime : मुलाची तक्रार केली म्हणून पालकांचा शिक्षकालाच चोप, नक्की काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Delhi Crime News : मुलाची तक्रार करणाऱ्या शिक्षकालाच पालकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Student's Family Beaten Teacher : देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकांने पालकांकडे विद्यार्थ्याची तक्रार केली म्हणून पालकांनी चक्क शिक्षकालाचा मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीमधील जनता फ्लॅट्स नंद नगरी परिसरातील सर्वोद्य बाल विद्यालयामधील (Sarvodaya Bal Vidyalaya) हा विचित्र प्रकार समोर आला आहे. पाल्याची तक्रार केल्यावर नाराज पालकांनी शिक्षकालाच चोप दिला. सर्वोद्य बाल विद्यालयामधील आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी तक्रार केली. यानंतर शिक्षकाने या विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावून विद्यार्थ्याची तक्रार केली. पण या विद्यार्थ्याच्या पालकांना आपल्या पाल्याची तक्रार ऐकल्यानंतर राग अनावर झाला आणि त्यांनी शिक्षकालाच मारहाण केली. हे प्रकरण अखेर दिल्ली पोलिसांकडे (Delhi Police) पोहोचलं असून पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे.
नक्की काय घडलं?
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीताल सर्वोद्य बाल विद्यालयामध्ये (Sarvodaya Bal Vidyalaya) ही घटना घडली. पीडित शिक्षकाचं नाव सनोज कुमार असून त्यांनी टीजीटी कंप्युटर सायन्स पदवी मिळवली आहे. पीडित शिक्षकाने तक्रार दिली आहे की, शाळेत एका विद्यार्थ्याच्या पालकांनी त्यांना मारहाण केली. यामुळे त्यांना दुखपतही झाली आहे. शिक्षक सनोज कुमार यांच्यावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाळेमध्ये पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलं आहे की, आठवीमधील एका विद्यार्थ्याची इतर विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आलं होतं. या विद्यार्थ्यामुळे वर्गातील इतर विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रार करण्यासाठी त्याच्या पालकांना बोलावण्यात आलं होतं. शिक्षक सनोज कुमार विद्यार्थ्याच्या पालकांसोबत बोलत असताना विद्यार्थ्याच्या काकांनी सनोज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर मुलाची आई आणि इतरांनीही शिक्षकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये शिक्षक सनोज कुमार जखमी झाले असून त्यांच्यावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इतर शिक्षकांनी काय सांगितलं?
सनोज कुमारचे सहकारी शिक्षकांनी शनिवारी पोलिस स्टेशनमध्ये जबाब नोंदवला. शिक्षकांनी या घटनेबाबत पोलिसांकडून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. सनोज कुमार यांच्या सहकारी शिक्षकांनी सांगितलं की, त्या मुलाची तक्रार घेऊन इतर अनेक विद्यार्थ्यांचे पालक शाळेत आले होते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आलं होतं. पण त्यांनी उलट शिक्षकालाच मारहाण केली. मात्र या घटनेनंतर शिक्षकांना आपल्या सुरक्षेची चिंता वाटू लागली आहे. कारण अशा घटना कुणासोबतही घडू शकतात. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून पोलीस लवकरच एफआयआर नोंदवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अन्य कोणत्याही शिक्षकासोबत असे घडू नये, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, असं इतर शिक्षकांचं म्हणणं आहे.
शाळांचं विलिनीकरण भांडणाचं कारण
पालक संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद सागर यांनी या घटनेच वेगळंच कारण सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अलीकडेच दिल्ली सरकारने वेगवेगळ्या शाळांचं विलिनीकरण केलं आहे. यामुळे एका शाळेत दोन शाळांचे विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत आहेत. त्यामुळे केवळ जागाच कमी झाली असून तर शाळेच्या इमारतवरही बोजा वाढला आहे. याचा परिणाम शिक्षकांवरही होत आहे. दुसरं कारण म्हणजे वेगवेगळ्या शाळांतील मुलांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे त्यांच्यात रोज वाद होतात. या सर्व प्रकारामुळे शिक्षकही प्रचंड तणावाखाली आहेत.