फिजीओथेरपीच्या बहाण्याने महिलांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
फिजीओथेरपीच्या बहाण्याने महिलांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. एरीक अंकलेसारिया असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नवी मुंबई : फिजीओथेरपीच्या बहाण्याने महिलांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. एरीक अंकलेसारिया असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नवी मुंबई पोलीसांनी त्याला माटुंगा येथून अटक केली आहे.
तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिजिओथेरपी करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार केली होती. आरोपीने त्या महिलेला व्हॉट्सअॅपवरून कॉल केला होता. पोलिसांनी या नंबरचा तपास केला असता तो ठराविक वेळीच वापरला जात असल्याचे समोर आले. यानुसार पोलिसांनी तपासावर भर दिला. यातून मिळालेल्या माहितीवरून भांडूप येथे राहणाऱ्या एरीक अंकलेरिया याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
त्याच्याविरोधात नवी मुंबई , ठाणे, मुंबई येथे विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने अनेक महिलांना मोबाईल फोनवरून कॉल करुन अश्लील चाळे करत विनयभंग केल्याचे समोर येत आहे. त्याच्यावर मुंबईत पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हाही दाखल आहे.
कशी झाली उकल
एरीक हा स्वत: डॉक्टर असल्याचे सांगून फिजिओथेरपी सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये फोन करून एका रूग्णाला गुप्तांगाची थेरपी हवी असल्याचे सांगायचा. त्यानतंर स्वत:च हॉस्पिटलमध्ये जावून थेरपीदरम्यान संबंधित महिलांचा मोबाईल नंबर मिळवायचा. त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलांना अश्लील कॉल करायचा. तर पकडले जावू नये यासाठी प्रत्येक महिलेला एकदाच संपर्क साधायचा. त्यासाठी तो वेगळा मोबाईल वापरात होता. मात्र एकाच दिवशी त्याने कोलकाता, मुंबई येथून दोन महिलांना कॉल केल्याने पोलिसांनी त्या दिवशीच्या विमान प्रवाशांची यादी तपासली. त्यात आरोपी एरीक याचे नाव समोर आले.