(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Bus Accident : एसटीच्या चाकाखाली आल्याने बालकाचा मृत्यू; शेवगावमधील दुर्देवी घटना
ST Bus Accident : एसटी बसच्या धडकेत 9 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. सायकलवरून जात असताना एसटी बसला आदळल्याने हा अपघात झाला.
शेवगाव : अहमदनगरमधील (Ahmednagar News) शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील मळेगाव येथे एसटी बसच्या (ST Bus) चाकाखाली सापडून एका 9 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मळेगाव येथील शेवगाव-नगर रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या वनवे कुटुंबातील श्लोक गणेश वनवे हा नऊ वर्षीय बालक आपल्या घराकडून मळेगाव गावाकडे सायकलवर जात असताना हा अपघात झाला. या अपघातीनंतर गावावर शोककळा पसरली आहे.
श्लोक गणेश वनवे हा नऊ वर्षीय बालक आपल्या घराकडून मळेगाव गावाकडे सायकलवर जात होता. श्लोक याच्यासमोरून रिक्षा जात होती. या रिक्षाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक समोरून राहुरीच्या दिशेने जाणारी शेवगाव-राहुरी बस आली. त्यावेळी बस चालकाला अंदाज न आल्याने श्लोकची सायकल बसच्या पुढील चाकाला धडकली आणि श्लोक आदळला गेल्याने बसच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली डोके सापडून जागीच ठार झाला.
श्लोक वनवे याचे वडील हे सोलापूर येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. दरम्यान हलगर्जीपणे वाहन चालवून अपघात केल्याबद्दल शेवगाव आगाराचे चालक शहादेव लक्ष्मण गोरे रा.जोहरापुर ता.शेवगाव ( वय 51) यांच्या विरोधात मोटार वाहन कलम 184/177 तसेच 304/अ ,337/338 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्लोकच्या अपघाती जाण्याने मळेगाव गावावर शोककळा पसरली आहे.
भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; 12 वर्षीय मुलाचा करुण अंत
पुण्यात अपघाताच्या संख्येत सातत्याने (Pune Accident) वाढ होत आहे. त्यातच भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने 12 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याचे वडील गंभीर जखमी झालेत. रासे फाटा येथे 4 नोव्हेंबर रोजी अपघात झाला. श्रीमंत भीमा धनवे (वय 39 वर्ष) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या मुलगा राकेश श्रीमंत धनवे (वय 12 वर्ष) याचा अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत श्रीमंत धनवे यांनी चाकण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. तर, पोलिसांनी बंडू सुदाम धायबर याला ताब्यात घेतले आहे. बंडू धायबर (वय 46) हा शिक्रापूर तालुक्यातील शिरूर येथील रहिवासी असून, तो आयशर टेम्पोचा चालक आहे.