Mumbai Crime : दोन हजारांच्या 5.10 लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटांसह दोघांना बेड्या
दोन हजार रुपयांच्या 5.10 लाख रुपये किंमतीच्या 255 बनावट नोटांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. क्राईम इंटेलिजन्स युनिटने सापडल्या बनावट नोटा छापल्या आणि वितरित केल्याप्रकरणी ही कारवाई केली.
मुंबई : दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा छापल्या आणि वितरित केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने दोघांना अटक केली आहे. या दोघांकडे दोन हजार रुपयांच्या 5.10 लाख रुपये किंमतीच्या 255 बनावट नोटा सापडल्या. अर्शद मोहम्मद सिद्दीकी (वय 42 वर्षे) आणि आणि लवेश सीताराम तांबे (वय 41 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. यापैकी मोहम्मद अर्शद हा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी असून लवेश तांबे हा ठाण्यातील कळवा इथे राहतो अशी माहिती पोलिसांनी दिली.
सीआययूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसजवळ एक व्यक्ती बनावट चलनी नोटांची खेप देण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलीस पथकाने या ठिकाणी सापळा रचून लवेश तांबे याला बनावट नोटा देण्यासाठी आलेल्या अर्शद सिद्दिकीला पकडलं. तसंच तांबे लाही घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आलं.
बनावट चलनी नोटा खऱ्या म्हणून वापरल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम 489 (A) आणि (b) अन्वये आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल 120 ब अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बनाावट नोटा छापायचे आणि खऱ्या दिसाव्यात यासाठी त्या घाण करायचे.
पोलिसांनी आरोपींकडून 2000 रुपयांच्या 255 नकली नोटा जप्त केल्या. "आरोपींच्या प्राथमिक चौकशीत असं दिसून आले आहे की सिद्दीकी प्रिंटर वापरुन घरीच बनावट नोटा तयार करायचा. आम्ही प्रिंटर जप्त केला आहे," अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
ते पुढे म्हणाले की, "जप्त करण्यात आलेल्या नोटा उच्च दर्जाच्या नाहीत. स्थानिक बाजारात बनावट नोटा चलनात आणायचा आरोपींचा इरादा होता, असा आम्हाला संशय आहे. त्यांच्याशी संबंधित आणखी लोक आहेत का, हे तपासण्यासाठी आम्ही आरोपींचे मोबाईल फोनही जप्त केले आहेत. तसंच ते बनावट चलनी नोटांच्या रॅकेटमध्ये कधीपासून सामील आहेत याचाही तपास करत आहेत."
दरम्यान, चलनी नोटांचा पाऊस पाडण्याचं नाटक करुन या दोघांनी लोकांना आमिष दाखवल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी या बनावट चलनी नोटा काळ्या जादूसाठी वापरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता त्यांना 23 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.