Vodafone Idea : व्होडाफोन आयडियाला 'अच्छे दिन' येणार, कंपनीच्या बोर्डची 45,000 कोटींची निधी उभारण्यास मंजुरी
व्होडाफोन आयडियाने कंपनीकडून इक्विटी आणि कर्जाच्या माध्यमातून एकूण 45,000 कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. कंपनीचे एकूण बँक कर्ज सध्या 4,500 कोटी रुपये आहे.
Vodafone Idea Update: आर्थिक संकटाचा सामना करत असलेली देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Vodafone Idea च्या बोर्डाने 20,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्यास मान्यता दिली आहे. हा निधी इक्विटी किंवा इक्विटी लिंक्ड साधनांद्वारे उभारला जाईल. कंपनीने सांगितले की, कंपनीने 2 एप्रिल 2024 रोजी आपल्या भागधारकांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये मंजुरी मिळाल्यानंतर येत्या तिमाहीत हा निधी उभारण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती आहे.
नियामक फाइलिंगमध्ये माहिती नमूद
व्होडाफोन आयडियाने स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, 27 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या कंपनीच्या बैठकीत त्यांनी इक्विटीद्वारे 20,000 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे. मंडळाने निधी उभारणीची कसरत पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ, बँकर आणि वकील नियुक्त करण्यास व्यवस्थापनाला मान्यता दिली आहे. 2 एप्रिल 2024 रोजी कंपनीच्या भागधारकांची बैठक होणार आहे, त्यामध्ये निधी उभारणीसाठी मंजुरी घेतली जाईल. शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर इक्विटी फंड उभारण्याची प्रक्रिया येत्या तिमाहीत पूर्ण केली जाईल.
45,000 कोटी रुपये उभारले जातील
कंपनीने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनीचे प्रवर्तक देखील या निधी उभारणीत सहभागी होतील. कंपनीने सांगितले की ते कर्जाच्या माध्यमातून निधी देण्याबाबत आपल्या कर्जदारांशी चर्चा करत आहेत. कंपनी इक्विटी आणि कर्जाच्या माध्यमातून एकूण 45, 000 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीचे एकूण बँक कर्ज सध्या 4500 कोटी रुपये आहे.
5G सेवा सुरू केली जाईल
व्होडाफोन आयडिया कंपनीने सांगितले की, इक्विटी आणि डेट फंडाच्या माध्यमातून कंपनी 4G कव्हरेज आणि 5G सेवेच्या रोलआउटसह विस्तार योजनांवर खर्च करेल. या गुंतवणुकीद्वारे कंपनी आपली स्पर्धात्मकता सुधारू शकेल आणि ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकेल.
Airtel आणि Jio नंतर आता Vodafone-Idea देखील भारतात 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी भारतात आपली 5G सेवा पुढील 6-7 महिन्यांत सुरू करू शकते. 5G शर्यतीत Vodafone-Idea च्या एंट्रीमुळे Jio आणि Airtel यांना कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मागील अनेक महिन्यांपासून VI कंपनीची अवस्था ही फार बिकट आहे. त्यामुळे 5G सेवा लॉन्च केल्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीमध्ये बराच फरक पडू शकतो. तसेच 5G सेवेमुळे कंपनीच्या युजर्स रेटमध्येही बराच फरक पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.
ही बातमी वाचा: