केंद्राकडून राज्यांना 1 लाख 73 हजार कोटींचा करपरतावा, महाराष्ट्राला 10 हजार 930 कोटींचा निधी, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्र्यांचे आभार
Tax Devolution : केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाकडून राज्य सरकारांना कर परतावा जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राला 10930 कोटी रुपये मिळाले आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना करपरतावा जारी केला आहे.भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना या निधीचं वाट केलं आहे. केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. केंद्रानं राज्यांना एकूण 1 लाख 73 हजार 030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केलं. महाराष्ट्राला 10930.31 कोटी रुपयांचा निधी मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार माणे आहेत.
केंद्र सरकारने काल राज्य सरकारांना त्यांच्याकडे जमा झालेल्या कराच्या रकमेतून 1 लाख 73 हजार 030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले. डिसेंबर 2024 मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण 89,086 कोटी रुपये इतके होते.त्या तुलनेत जानेवारी महिन्यातील रकमेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
केंद्रानं राज्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात असल्याची माहिती दिली.
सर्वाधिक निधी उत्तरप्रदेशला
केंद्र सरकारनं जारी केलेल्या निधीपैकी सर्वाधिक निधी उत्तर प्रदेशला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशला 31039.84 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्या पाठोपाठ बिहारचा नंबर येतो. बिहारला 17403.36 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मध्य प्रदेशला 13582.56 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो, राज्याला 10930.31 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानला देखील चांगला निधी मिळाला आहे. राज्यस्थानला 10426.78 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान, अर्थमंत्र्यांचे आभार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या करपरताव्यासंदर्भात आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मनापासून धन्यवाद देतो असं म्हटलं आहे. महाराष्ट्राला 10930.31 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल आभार मानत असल्याचं ते म्हणाले. यामुळं आमच्या महाराष्ट्रातील लोकांच्या विकासाच्या प्रयत्नांना यामुळं बळ मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात अन् मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या विकासाचं काम सुरु राहील,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट
Thank you Hon PM Modi Ji & FM Sitharaman ji!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 10, 2025
Heartfelt thanks to Hon PM Narendra Modi Ji and Hon Finance Minister Nirmala Sitharaman ji for releasing ₹10,930.31 crore as monthly tax devolution to Maharashtra!
This significant support will greatly accelerate our development… pic.twitter.com/g9NUTHQjhC
इतर बातम्या :
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?
























