घराच्या टेरीसवर महिलेनं केला अनोखा प्रयोग, 300 हून अधिक फळे फुले आणि भाज्यांची लागवड
Success Story : महिलेनं आपल्या घराच्या टेरीसवर 300 हून अधिक भाज्या पिकवल्या आहेत. रितू गोयल असं आग्रा (Agra) जिल्ह्यातील बलकेश्वर येथील इंद्र एन्क्लेव्ह येथे राहणाऱ्या या महिलेचं नाव आहे.
Success Story : अलीकडच्या काळात अनेक लोक शेतीत (Agriculture) नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यशस्वी शेती करत आहेत. यातून भरघोस उत्पादन देखील मिळवतायेत. शेती क्षेत्रात महिलांच्या बरोबरीनं स्त्रिया देखील राबताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका महिलेची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. ज्या महिलेनं आपल्या घराच्या टेरीसवर 300 हून अधिक भाज्या पिकवल्या आहेत. रितू गोयल असं आग्रा (Agra) जिल्ह्यातील बलकेश्वर येथील इंद्र एन्क्लेव्ह येथे राहणाऱ्या या महिलेचं नाव आहे.
रितू गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना लहानपणापासून बागकामाची आवड होती. दरम्यान, 2021 मध्ये कोरोना संकटाच्या काळात त्यांनी गच्चीवर छोट्या कुंड्यांमध्ये रोपे लावली होती. त्यानंतर त्यांनी घराच्या गच्चीवर विविध प्रकारच्या भाज्या लावण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्याकडे 300 हून अधिक प्रकारच्या भाज्या सेंद्रिय पद्धतीनं पिकवल्या जात आहेत. यामुळं रितू गोयल यांची सर्वत्र चर्चा होत आहे.
झाडांमुळे घराचे तापमानही खूप कमी राहते
कोरोनाच्या काळात थोड्या प्रमाणातच कुंड्या होत्या. त्यामध्ये भाज्यांची लागवड केली होती. मात्र, हळूहळू भाज्यांचे प्रमाण वाढत गेले. यानंतर टेरीसचे रुपांतर बागेत झाल्याची माहिती रितू गोयल यांनी दिली. टेरीसवर लावलेल्याभाज्यांमध्ये वांगी, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर, पालक, धणे, पुदिना, मिरची आदी भाज्या पिकवल्या जात आहेत. भाजीपाल्याशिवाय फुलांची छोटी झाडे आणि अनेक वनौषधीही लावल्या आहेत. रितू स्वतः या रोपांची काळजी घेतात. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचेही सहकार्य आहे. आता त्याचे घर पूर्णपणे झाडांनी भरले आहे आणि हिरवेगार दिसत आहे. या झाडांमुळे घराचे तापमानही खूप कमी राहत असल्याची माहिती त्यांनी दिली.
विविध फळांचीही लागवड
दरम्यान, रितू गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरू, चेरी, संत्रा, लिंबू, आंबा, ब्लॅकबेरी, डाळिंब, काकडी, काकडी, वांगी, टोमॅटो, भेंडी, कढीपत्ता, पालक, पुदिना, क्रॅनबेरी, हळद, दालचिनी, बडीशेप, तुळस, मारवा तुळस या वनस्पतींची देखील रितू गोयल यांनी लागवड केलीय. फुलांमध्ये अपराजिता, हरसिंगार, सदाहरित, झेंडू, चमेली, चंपा, कणेर, रात राणी, पिटुतिया, 8 जातींचे गुलाब, हिबिस्कस, मोगरा, एस्टर, बोगनविले, मधुमालती, गणेश वेल अशा विविध प्रकारच्या फुलांची देखील लागवड केलीय.
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून इतरांनाही मार्गदर्शन
या भाजीपाला लागवडीच्या संदर्भात रितू गोयल यांनी एक व्हॉट्सॲप ग्रुपही तयार केलाय. यावर त्या वनस्पतींची काळजी कशी घ्यायची यासंदर्भातील माहिती देत असतात. मुंबई, जयपूर, लखनौ, भोपाळ, दिल्ली, गुडगाव ते लंडन अशी विविध ठिकीणचे सदस्य त्यांच्या या ग्रुपवर जोडले गेले आहेत.
पर्यावरण संतुलनासाठी रितू गोयल प्रयत्नशील
रितू गोयल या निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संतुलनासाठी देखील काम करतात. तसेच शाळा, उद्याने, झाडे लावणे यामध्येही त्या काम करतात. दर महिन्याला त्या रोपांचे वाटप देखील करतात.
महत्वाच्या बातम्या: