Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील अर्थसंकट; भारत-श्रीलंका व्यापार ठप्प, भारतीय व्यापारी चिंतेत
Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील अस्थिरतेचा परिणाम भारतासोबतच्या व्यापारावरही होत आहे. श्रीलंकेतील संकटामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
Sri Lanka Crisis : श्रीलंकेत सुरू असलेल्या आंदोलनामुळे (Sri Lanka Crisis) मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. आर्थिक संकटाच्या परिणामी देशात नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. या अस्थिरतेचा फटका भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा (India Sri Lanka) व्यापार ठप्प झाला आहे. तर, दुसरीकडे भारतीय निर्यातदारांची चिंता वाढली आहे. श्रीलंकेत निर्यात केलेल्या वस्तूंचे पैसे अद्यापही न मिळाल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती आहे.
श्रीलंका आतापर्यंतच्या अभूतपूर्व आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. देशातील नागरिकांना अन्नधान्य, औषधे, इंधनांच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातून नागरिकांमध्ये सरकारविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे.
भारतीय निर्यातदारांची संघटना 'फियो' चे उपाध्यक्ष खालिद खान यांनी सांगितले की, श्रीलंकेतील अस्थिरतेच्या परिणामी निर्यात आणि आयात पूर्णपणे ठप्प झाली आहे. राजकीय संकट आणि आपल्या थकित देयकांबाबत निर्यातदार अधिक सावध झाले आहेत. श्रीलंकेत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर स्थितीत अधिक सुधारणा होण्याची शक्यता आहे.
फियोचे अजय सहाय यांनी सांगितले की, राजकीय स्थिरता आल्याने व्यापार पुन्हा एकदा सुरू होण्यास मोठी मदत मिळेल. उद्योगांसाठी कच्चा माल, औषधे, उर्वरक, खाद्यान्न आणि कपडा आदींची निर्यात करण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतातून श्रीलंकेत 5.8 अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली होती. या वर्षी एप्रिलमध्ये हा व्यापार 55 कोटी डॉलर इतका झाला होता. मागील आर्थिक वर्षात एक अब्ज डॉलरची आयात करण्यात आली होती. तर, एप्रिल 2022 मध्ये 7.4 कोटी डॉलरची आयात करण्यात आली होती. भारत आणि श्रीलंका दरम्यान वर्ष 2000 मध्ये मुक्त व्यापार करार झाला होता.
मुंबईतील निर्यातदार आणि टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शरद कुमार सराफ यांनी सांगितले की, व्यापारात मोठी घट झाली आहे. जानेवारीपासून श्रीलंकेसोबत आमचा व्यापार 25 टक्क्यांनी घटला आहे. तेथील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.