Share Market: कोरोनाच्या धोक्यामुळे शेअर बाजारावर भीतीचे सावट; सेन्सेक्स घसरला, फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांपर्यंत वाढ
Stock Markets Updates: चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे भारतात खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. परिणामी भांडवली बाजारावर भीतीचे सावट आहे.
मुंबई: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसून येत आहे. कोरोनाच्या वाढत्या चिंतेमुळे बाजारात आज मोठी भीती असल्याचं दिसून आलं. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज प्रत्येकी एका टक्क्याची घसरण झाली आहे. त्याचवेळी फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज 1.75 ते 5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली
काही बड्या शेअर्ससोबत मध्यम आणि लहान शेअर्समध्येही आज घसरण झाली. बँकिंग, मेटल आणि रिअॅलिटी शेअर्सवर आज विक्रीचा दबाब राहिला.
चीन, जपान आणि इतर काही देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना भारतामध्येही सतर्कता बाळगण्यात येत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाचे संकट अद्याप संपलेलं नाही, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे आणि मास्कचा वापर केला पाहिजे असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी केलं आहे. त्याचा काहीसा परिणाम भारतीय भांडवली बाजारवर दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीमध्येही आज पाच पैशाची घसरण होऊन तो 82.81 वर पोहोचला.
Shares Of Pharma Companies: फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ
आज डिव्हीज लॅब (Divis Labs), सिप्ला (Cipla), अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospital), सन फार्मा (Sun Pharma) आणि डॉ. रेड्डीज लॅब या फार्मा कंपन्या टॉप निफ्टी गेनर्स ठरल्या. डिव्हीज लॅब (Divis Labs) कंपनीच्या निफ्टीमध्ये 4.99 टक्क्यांची वाढ झाली. तर अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospital) मध्ये 3.69 , सिप्ला (Cipla) 3.38, सन फार्मा (Sun Pharma) 1.75 टक्यांची वाढ झाली. त्याचवेळी अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट्स, इंडसइंड बँक आणि बजाज फिन या टॉप निफ्टी लूजर्स कंपन्या ठरल्या.
सेन्सेक्समध्ये 635 अंकांची घसरण
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 635 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 179 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 1.03 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,067 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 0.98 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,205 वर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही (Nifty Bank) आज तब्बल 741 अंकांची घसरण होऊन तो 42,617 वर पोहोचला.
या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली
- Divis Labs- 4.99 टक्के
- Apollo Hospital- 3.69 टक्के
- Cipla- 3.38 टक्के
- Sun Pharma- 1.75 टक्के
- HCL Tech- 1.03 टक्के
या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली
- Adani Enterpris- 6.32 टक्के
- Adani Ports- 3.01 टक्के
- IndusInd Bank- 2.19 टक्के
- Bajaj Finserv- 2.10 टक्के
- UltraTechCement- 2.08 टक्के