Share Market : शेअर बाजारात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची संपत्ती 1 लाख कोटींनी वाढली, सेन्सेक्स निफ्टीवर काय घडलं जाणून घ्या
Share Market : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संपत्ती एक लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीवर आंतरराष्ट्रीय बाजार बंद असल्याचा परिणाम दिसून आला.

मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स घसरणीसह बंद झाला. तर निफ्टीमध्ये नाममात्र तेजी पाहायला मिळाली. नववर्षाच्या निमित्तानं जगभरातील विविध बाजार बंद असल्यानं त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. शेअर बाजारात तेजी आणि घसरण मोठ्या प्रमाणावर दिसून आली नाही. सेन्सेक्स 32 अंकांच्या घसरणीसह 85188.60 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 मध्ये 16.95 अंकांची तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 50 निर्देशांक 36146.55 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सवर 30 पैकी 22 स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. तर, निफ्टी 50 मध्ये 38 शेअरमध्ये तेजी दिसून आली.
Share Market :गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या सर्व कंपन्यांचं बाजारमूल्य 31 डिसेंबर 2025 ला 4,75,79,238.11 कोटी रुपये होते. आज म्हणजेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी यात एक लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईवरील कंपन्यांचं बाजारमूल्य 4,76,88,072.08 कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांची संपत्ती 1,08,833.97 कोटी रुपपयांनी वाढली आहे.
सेन्सेक्समधील 30 स्टॉक पैकी 22 स्टॉक तेजीसह बंद झाले. एनटीपीसी, झोमॅटो, इटर्नल, एम अँड एम या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली. दुसरीकडे आयटीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंटसच्या शेअर मध्ये घसरण झाली.
शेअर बाजारात फारशी तेजी नसल्यानं सर्व निर्देशांकात 1 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. निफ्टी ऑटोमध्ये 1 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. तर, निफ्टी एफएमसीजीमध्ये 3 टक्क्यांची घसरण दिसून आली.
भारतीय शेअर बाजारात बीएसईवर आज 4335 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. यापैकी 2211 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 1952 स्टॉकमध्ये घसरण झाली. 172 स्टॉकमध्ये कोणताही बदल झाला नाही. 144 स्टॉकनं 52 आठवड्यांचा उच्चांक आज गाठला. तर 87 स्टॉकनं 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. शेअर बाजारात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 10 स्टॉकला अप्पर सर्किट लागलं तर 8 स्टॉकला लोअर सर्किट लागलं.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)























