Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीची लाट, सेन्सेक्सची 1000 अंकांची उसळी
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज तेजी दिसत असून सेन्सेक्स 800 अंकांहून अधिक अंकांनी वधारला. तर, निफ्टीनेदेखील 18300 अंकांजवळ पोहचला.
Share Market Opening Bell: अमेरिकेमध्ये ऑक्टोबर महिन्यातील महागाई दरात घट झाल्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून आला. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात दमदार झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 800 अंकांनी वधारत 61,414 अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 244 अंकांच्या तेजीसह 18,272 अंकांवर खुला झाला. सेन्सेक्सने पुन्हा एकदा 61 हजार अंकांचा टप्पा ओलांडला.
शेअर बाजारात आज तेजी दिसून आल्याने बँक निफ्टीने 42000 अंकांचा टप्पा ओलांडला आहे. बाजारातील तेजी सर्वच सेक्टरमध्ये दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आतापर्यंत उच्चांक 61,685.51 अंकांचा टप्पा गाठला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 946 अंकांनी वधारत 61,560.31 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 269 अंकांच्या तेजीसह 18,298.15 अंकांवर व्यवहार करत होता.
आज, बाजारात आयटी, एफएमसीजी, एनर्जी, ऑटो सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील 49 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, एका कंपनीच्या शेअर्सच्या दरात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 29 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, एका कंपनीच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
बाजारात तेजी का?
ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील महागाईचा दर कमी झाला असल्याचे समोर आले. महागाई दर 7.7 टक्के होता. तर, सप्टेंबर महिन्यात महागाई दर 8.2 टक्के होता. महागाई दरात घट झाल्याचे समोर आल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. नॅसडॅकमध्ये 7.35 टक्के म्हणजे 760 अंकांच्या तेजीसह 11,114 अंकांवर स्थिरावला. तर, डाऊ जोन्स 1200 अंकांच्या तेजीसह 33,715.37 अंकांवर स्थिरावला.
गुरुवारी बाजारात नफावसुली
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी नफावसुली झाल्याने घसरण दिसून आली. जागतिक पातळीवर शेअर बाजारात पडझड दिसून आली होती. त्याचा परिणाम आज बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 419 अंकांच्या घसरणीसह 61 हजार अंकांच्या खाली घसरून 60,613 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (NSE) निफ्टी (Nifty) निर्देशांक 120 अंकांच्या घसरणीसह 18,036 अंकांवर बंद झाला.