ADAG Group Shares : अनिल अंबानी यांच्यावर सेबीची मोठी कारवाई, ADAG ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स गडगडले!
ADAG Group SEBI Action : सेबीने अनिल अंबानी यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर ADAG उद्योग समूहाचे शेअर गडगडले आहेत.
मुंबई : देशातील बडे उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यावर बाजार नियामक सेबीने मोठी कारवाई केली आहे. सेबीच्या या कारवाईमुळे ADAG उद्योग समूहाच्या शेअर बाजारावली सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स चांगलेच गडगडले आहेत. त्यामुळे या कंपन्यांत गुंतवणूक असणाऱ्या गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.
सेबीचा निर्णय आल्यानंतर ADAG उद्योग समूहाच्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स दिवसभरातील सर्वाधिक मूल्याच्या तुलनेत 17 टक्क्यांनी पडले आहेत. सेबीने अनिल अंबानी यांना इक्विटी मार्केटमध्ये भाग घेण्यास पाच वर्षांची बंदी घातली आहे. तसेच 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ADAG उद्योग समूहाच्या स्टॉकमध्ये घसरण
सेबीने ADAG उद्योग समूहावर कारवाई केल्याचे लक्षात येताच शेअर बाजारात खळबळ उडाली. सेबीच्या या निर्णयामुळे या उद्योग समूहाच्या कंपन्याचे शेअर्स गडगडले. रिलायन्स इन्फ्रा कंपनीचा स्टॉक 243.64 वन डे हाय वरून 201.99 रुपयांपर्यंत साधारण 17 टक्क्यांनी घसरला. गुरुवारी या शेअरची किंमत 235.71 रुपये होती. गुरुवारच्या तुलनेत हा शेअर आज 14.30 टक्क्यांनी घसरला. याच उद्योग समूहातील रिलायन्स पॉवर या कंपनीचीही अशीच स्थिती राहीली. या कंपनीच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. या कंपनीचा शेअर वन डे हाय 38.11 रुपयांवरून 9.52 टक्क्यांनी घसरला. रिलायन्स होम फायनान्स या कंपनीचा स्टॉकही 5.12 टक्क्यांनी घसरून 4.45 रुपयांच्या लोअर सर्किटवर आला.
अनिल अंबानी यांच्यावर नेमकी काय कारवाई झाली?
सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह अन्य लोकांविरोधात मोठा निर्णय दिला आहे. यामध्ये रिलायन्स होम फायनान्सचे माजी विनियर एक्झिक्युटिव्हचाही समावेश आहे. या सर्वांना पुढच्या पाच वर्षांपर्यंत सिक्योरिटी मार्केटमध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. कंपनीला मिळालेल्या आर्थिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी सेबीने हा निर्णय दिला आहे. सेबीने अनिल अंबानी यांना 25 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यासह अनिल अंबानी यांना सिक्योरिटी मार्केटमध्ये सहभाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच ते शेअर बाजारावर लिस्टेड कंपनीच्या संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकाच्या पदावर राहू शकणार नाहीत. रिलायन्स होम फायनान्स या कंपनीविरोधात 2018-19 साली एक तक्रार दाखल करण्यात आली होती. कंपनीला मिळालेला निधी अन्य ठिकाणी वळवल्याचा आरोप तेव्हा करण्यात आला होता. सेबीने नंतर या आरोपांची चौकशी केली होती. त्यानंतर आता सेबीने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलं! सर्वांत मोठी अडचण दूर; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!