Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर ट्रेडमार्कच्या शर्यतीतून रिलायन्सची माघार, नेमकं कारणं काय सांगितलं?
Operation Sindoor : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं ऑपरेशन सिंदूर या ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता. सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरु होती.

Operation Sindoor Reliance Industries मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं 'ऑपरेशन सिंदूर'चा ट्रेडमार्क रजिस्टर करण्याचा निर्णय मागं घेतला आहे. रिलायन्सनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धीपत्रक जारी करत माघार घेतली आहे. ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याच्या पराक्रमाचं प्रतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेचा हिस्सा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे यूनिट जिओ स्टुडिओज आपला ट्रेडमार्कचा अर्ज मागं घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एका कनिष्ठ अधिकाऱ्यानं अनावधानानं अर्ज केला होता, असं रिलायन्सनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्यांच्या सर्व स्टेक होल्डर्सला ऑपरेशन सिंदूरचा अभिमान आहे. पाकिस्तानकडून पहलगाम दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, त्याला भारतानं उत्तर दिलं होतं. ऑपरेशन सिंदूर दहशतवादाच्या विरोधातील भारताच्या लढाईतील सैन्य दलांच्या अभिमानास्पद यश आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात रिलायन्स आपल्या सरकार आणि सैन्य दलांसोबत उभं आहे. भारत प्रथम या आदर्श वाक्यासोबत असलेली आमची कटिबद्धता कायम आहे, असं रिलायन्स इंडस्ट्रीजनं म्हटलंय.
Media Statement
— Reliance Industries Limited (@RIL_Updates) May 8, 2025
Reliance Industries has no intention of trademarking Operation Sindoor, a phrase which is now a part of the national consciousness as an evocative symbol of Indian bravery.
Jio Studios, a unit of Reliance Industries, has withdrawn its trademark application,…
पहलगामचा बदला ऑपरेशन सिंदूरद्वारे पूर्ण
पहलगाम दहशतवादी हल्ला 22 एप्रिलला करण्यात आला होता. त्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 17 जण जखमी झाले होते. भारतानं या हल्ल्याचा बदला 7 मेच्या मध्यरात्री दीड वाजता एअर स्ट्राईक करुन घेतला होता. भारतानं पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला होता. या मध्ये जवळपास 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठकीत दिली होती. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जो शब्द वापरला होता, त्याला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं होतं.
इंडियन आर्मीनं ऑपरेशन सिंदूर असा फोटो पोस्ट करत जस्टीस इज सर्व्हड असा मजकूर लिहिला होता. बुधवारी ऑपरेशन सिंदूरबाबत सर्व जण बोलत होते. ऑपरेशन सिंदूर हा शब्द इतका प्रसिद्ध झाला की अनेकांनी याचा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ स्टुडिओकडून देखील ट्रेडमार्कसाठी अर्ज करण्यात आला होता. रिलायन्स शिवाय इतर अर्जरादारांनी अर्जदार वर्ग 41 नुसार ऑपरेशन सिंदूरचे एक्सक्लूझिव्ह राईटस मिळावेत यासाठी अर्ज केला होता. मात्र, रिलायन्सकडून माघार घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.























