Reliance AGM 2023: दिवाळीपूर्वी रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना गिफ्ट मिळणार? मुकेश अंबानी आज 'या' 5 मोठ्या घोषणा करण्याची शक्यता
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे. आज मुकेश अंबानी गुंतवणूक दारांसाठी काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष...
Reliance AGM 2023: रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज होत आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) एजीएममध्ये अनेकदा मोठ्या घोषणा करतात. यावेळीही शेअर बाजार आणि रिलायन्समधील 36 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना त्यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. रिलायन्सचा शेअर गेल्या काही काळापासून मर्यादीत प्रमाणात व्यवहार करत आहेत. एजीएममध्ये काही मोठ्या घोषणांमुळे याला चालना मिळू शकते, असा विश्वास आहे. रिलायन्सची एजीएम आज दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. रिलायन्सच्या एजीएममध्ये काय घोषणा केल्या जाऊ शकतात, हे जाणून घेऊया सविस्तर...
आयपीओ (IPO)
रिलायन्सच्या टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायाच्या आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेनं वाट पाहत आहेत. गेल्या एजीएममध्ये मुकेश अंबानी म्हणाले होते की, ते पुढील एजीएममध्ये जिओ आणि रिटेलच्या आयपीओबद्दल अपडेट देतील. गुगल, जनरल अटलांटिक, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि मेटा प्लॅटफॉर्मनं जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचप्रमाणे कतार इन्वेस्टमेंट अथॉरिटी, केकेआर, सिल्व्हर लेक पार्टनर्स आणि सौदी अरेबिया आणि सिंगापूरच्या सार्वभौम संपत्ती फंड्सनी रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये गुंतवणूक केली आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेज (Jio Financial Services)
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची लिस्टिंग गेल्या आठवड्यात झाली आहे. एजीएममध्ये, मुकेश अंबानी त्यांच्या पुढील रोडमॅपबद्दल खुलासा करू शकतात. कंपनीनं ब्लॅकरॉक या जगातील सर्वात मोठ्या एसेट मॅनेजमेंट कंपनीच्या सहकार्यानं म्युच्युअल फंड कंपनी सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सुरुवातीची गुंतवणूक 30 कोटी डॉलर्स दशलक्ष असेल. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कंपनी कंज्यूमर आणि मर्चंट लेडिंगमध्येही जाऊ शकते. काही गुंतवणूकदारांवर विश्वास ठेवला तर, कंपनी आधीच इंश्योरन्स ब्रोकिंग व्यवसायात आहे आणि तिचे 17 पेक्षा जास्त इंश्योरन्स पार्टनर्स आहेत.
5जी, जियो एयरफाइबर
रिलायन्सनं आपल्या वार्षिक अहवालात डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात 5G रोलआउट करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. याबाबत आजच्या एजीएममध्ये मुकेश अंबानी अनेक अपडेट्स देऊ शकतात. यासोबतच 5G प्रीपेड प्लॅनबद्दलही अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. यासोबतच Jio Bharat 4G फोन सारखा Jio 5G स्मार्टफोन आणण्याची कंपनीची योजना आहे का? याचीही बाजारात प्रतिक्षा आहे. गेल्या एजीएममध्ये कंपनीनं JioAirFiber लाँच करण्याची घोषणा केली होती. हे वायरशिवाय 5G स्पीड देईल. याचसंदर्भात अंबानी एजीएममध्ये लॉन्चची तारीख जाहीर करू शकतात.
न्यू एनर्जी
रिलायन्सनं 2035 पर्यंत कार्बन जीरो होण्यासाठी पुढील तीन वर्षांत न्यू एनर्जी बिजनेसमध्ये 10 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली आहे. याबाबत आजच्या एजीएममध्ये अंबानी अपडेट देऊ शकतात. यासोबतच यासंबंधित प्रोजेक्ट्स सुरू होण्याची तारीख आणि संभाव्य कमाईही जाहीर करू शकतात. परदेशी ब्रोकिंग फर्म Bernstein च्या मते, रिलायन्स 2030 पर्यंत आपल्या नव्या एनर्जी बिझनेसमधून 10 ते 15 अब्ज डॉलर्सची कमाई करू शकते. भविष्यात, हे कंपनीच्या ग्रोथसाठी फायदेशीर ठरू शकतं.
रिलायन्स रिटेलचा विस्तार
रिलायन्स रिटेलनं विविध कंज्यूमर सेगमेंट्समध्ये विस्तार केला आहे. कंपनीनं आपला FMCG ब्रँड 'Independence' उत्तर भारतातही लॉन्च केला आहे. येत्या काही दिवसांत, RRVL ई-कॉमर्समध्ये आपली उपस्थिती मजबूत करू शकते, तिची सप्लाई चेन मजबूत करू शकते आणि अधिग्रहणांवर (Acquisition) लक्ष केंद्रित करू शकतं. कंपनीच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या घोषणा करू शकतात.