गॅस सिलेंडर स्वस्त, मग पेट्रोल-डिझेलही स्वस्त होणार का? सरकारची नेमकी भूमिका काय?
सध्या सरकारने 6 महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळं पेट्रोल डिझेलचे दरही कमी होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
Petrol and Diesel Price : सध्या देशात अनेक दिवसापासून पेट्रोल डिझेलचे दर (Petrol and Diesel Price) स्थिर आहे. तेल विपणन कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, सध्या सरकारने 6 महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळं पेट्रोल डिझेलचे दरही कमी होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मात्र, यावर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग (Union Minister Hardeep Singh) यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.
नेमकं काय म्हणाले मंत्री हरदीप सिंग?
तेल विपणन कंपन्यांकडून डिझेलच्या विक्रीवर अंडर-रिकव्हरी सुरुच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय भू-राजकीय परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती स्थिरतेवर अवलंबून आहे. बाहेरील जगातील परिस्थिती स्थिर होऊ द्या, तेलाच्या किमती स्थिर होऊ द्या, मग पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती संदर्भात पाहता येईल असे मंत्री हरदीप सिंग म्हणाले. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये उत्पादन शुल्कात कपात करून 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दोनदा कमी केल्या आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली आहे. दोन्ही प्रसंगी कर कपात केल्यामुळे केंद्राला सुमारे 2.2 लाख कोटी रुपयांचे महसूल नुकसान सहन करावे लागल्याचे सिंग म्हणाले. उत्पादनात कपात करुनही जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या नाहीत.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात
सरकारने अलीकडेच 6 महिन्यांत दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे. त्यामुळं देशातील घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात मोठी घसरण झाली आहे. कालपासून सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी कमी झाल्या आहेत. तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर या किंमती पोहोचल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 900 रुपयांपेक्षा कमी होण्याची ही 30 महिन्यांतील पहिलीच वेळ आहे. या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये झाली आहे. दुसरीकडे, कोलकातामध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 829 रुपयांवर आली आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 802.50 रुपयांवर आली आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 818.50 रुपयांवर आली आहे.
कुठं दरवाढ तर कुठं स्वस्त
आंध्र प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर आसाम, बिहार, गुजरात, झारखंड आणि केरळसह काही राज्यांमध्ये इंधनाच्या किंमती कमी झाल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दर जैसे थे स्थिर आहेत.
महत्वाच्या बातम्या: