PAN AADHAAR Link : नागरिकांकडून आधार-पॅन लिंकची दिरंगाई; सरकारने वसूल केला 2100 कोटींचा दंड
PAN AADHAAR Link : दिलेल्या मुदतीनंतर आधार-पॅन कार्ड लिंक करणाऱ्यांकडून एक हजार रुपयांचा दंड घेतला जात आहे. आतापर्यंत नागरिकांकडून 2,125 कोटींचा दंड वसूल केला आहे.
Pan Card Aadhaar Link : केंद्र सरकारने पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) लिंक करण्यास दिरंगाई करणाऱ्यांकडून दंड वसुली सुरू केली आहे. दंडात्मक रक्कमेने सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे. दिलेल्या मुदतीनंतर आधार-पॅन कार्ड लिंक (PAN Aadhaar Link) करणाऱ्यांकडून एक हजार रुपयांचा दंड घेतला जात आहे. आतापर्यंत नागरिकांकडून 2,125 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने संसदेत ही माहिती दिली.
पॅन कार्ड डिअॅक्टिव्हेट केले नाहीत; सरकारची माहिती
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्यसभेच्या खासदार फुलो देवी नेताम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यांनी 30 जून 2023 पर्यंत किती लोकांनी त्यांचे पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक केले आहे? तसेच, पॅन-आधार नसल्यामुळे किती लोकांचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले आहे? या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, 30 जूनपर्यंत 54,67,74,649 पॅनकार्ड हे आधारशी लिंक करण्यात आले आहेत. कोणतेही पॅन कार्ड डिअॅक्टिव्हेट करण्यात आलेले नाही. जर आधारशी लिंक नसेल तर पॅन कार्ड फक्त इनऑपरेटिव्ह झाले आहे.
दंडामुळे सरकारच्या तिजोरीत 2125 कोटींची भर
फुलो देवी यांनी सरकारला विचारले की पॅन-आधार लिंक करण्यासाठी किती लोकांनी 1,000 रुपये दिले आहेत आणि सरकारने आतापर्यंत किती रक्कम वसूल केली आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले की, 1 जुलै 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुमारे 2.1 कोटी लोकांनी एक हजार रुपयांचा दंड भरून पॅन-आधार लिंक केले आहे. मुदतीनंतर आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने दंड ठोठावला होता. त्यातून सरकारने 2,125 कोटी रुपये वसूल केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
पॅन-आधार लिंक केल्यावर टॅक्स रिफंड नाही
पॅन-आधार न जोडल्यास करावयाच्या कारवाईची माहिती देताना, वित्त राज्यमंत्री म्हणाले, आधारशी पॅन लिंक न केल्यामुळे पॅन निष्क्रिय झाल्यानंतर करदात्याला कोणताही टॅक्स रिफंड दिला जात नाही. PAN निष्क्रिय राहण्याच्या कालावधीसाठी कर परताव्यावरील व्याज देखील दिले जात नाही. जर करदात्यावर कोणताही कर देय असेल तर तो कर जास्त दराने वसूल केला जातो. एका अंदाजानुसार, देशात सुमारे 70 कोटी पॅन कार्डधारक आहेत, त्यापैकी आत्तापर्यंत फक्त 60 कोटी पॅन कार्डधारकांनी पॅन-आधार लिंक केले आहे, त्यापैकी 2.125 कोटींनी दंड भरून लिंक केले आहे.