(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan : निवडणुकीत 42 अब्ज रुपये खर्च! आता कुणीही जिंको, पाकिस्तान या निवडणुकीनंतर बर्बाद होणार हे नक्की
Pakistan General Election Budget : गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीतील खर्च हा 26 टक्क्यांनी अधिक झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालंय.
मुंबई : पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Pakistan Economy) आधीच खड्ड्यात जात असताना निवडणुकीमुळे त्याला आणखीनच हातभार लागत असल्याचं चित्र आहे. कारण ही निवडणूक पाकिस्तानच्या इतिहासाताली सर्वात खर्चिक निवडणूक (Pakistan General Election) ठरणार आहे. पाकिस्तानमध्ये संसदेच्या निवडणुका सुरू असून त्यासाठी तब्बल 42 अब्ज रुपये खर्च होणार आहेत. आधीच खायची मारामारी झालेल्या पाकिस्तानमधील निवडणुकीच्या या खर्चाने त्यांच्या अर्थव्यवस्थेची मात्र पुरती वाट लागणार आहे. त्यामुळे इम्रान खान यांचा पक्ष असो वा नवाज शरीफ यांचा, सत्तेत कुणीही आलं तरीही पाकिस्तान बर्बाद होणार असंच चित्र सध्या तरी दिसतंय.
गेल्या वेळच्या तुलनेत 26 टक्क्यांनी खर्च जास्त
एकीकडे एक वेळच्या खायची मारामारी, त्यासाठी जगासमोर पाकिस्तानला हात पसरण्याची वेळ आली असतानाही निवडणुकीवर इतक्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. 42 अब्ज रुपयांच्य खर्चानंतर पाकिस्तानची अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आणणं नव्या पंतप्रधानाला जमणार आहे का असा प्रश्नही विचारला जात आहे. 2018 च्या तुलनेत यंदाची निवडणूक ही 26 टक्क्यांनी महाग असल्याचं आकडेवारी सांगतेय.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही अतिशय बिकट झाली आहे. आधीच्या पंतप्रधानांना आणि आताच्या पंतप्रधानांना ती मार्गावर आणण्याचं जमलं नाही.
पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. या निवडणुकीत सुमारे 12 कोटी मतदारांनी सहभाग घेतला होता. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या बातम्याही आल्या. त्यानंतर आता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पाकिस्तामध्ये लोकशाही नावालाच
पाकिस्तामध्ये लोकशाही असली तरीही ती नावालाच असल्यांच दिसून येतंय. पाकिस्तानी लष्कराचा आणि आयएसआयचा सातत्याने त्यामध्ये हस्तक्षेप होत असल्याने या ठिकाणच्या एकाही पंतप्रधानांना पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करता आला नाही. या सार्वत्रिक निवडणुकीच्या एक आठवडा आधी, इम्रान खान यांना 24 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याने पाकिस्तानमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती किती बिकट आहे याचा अंदाज येतो. याशिवाय इम्रान खान यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्हही रद्द करण्यात आले आहे.
उमेदवारांची संख्या मोठी
पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या सुरक्षेसाठी 7 लाख जवान तैनात करण्यात आले होते. 1 लाख 33 हजार सैनिक फक्त सिंधमध्ये तैनात होते. यावेळी उमेदवारांची संख्याही जास्त आहे. गेल्या 2018 च्या निवडणुकीत 11,700 उमेदवार रिंगणात होते. यावेळी 18,059 उमेदवार निवडणूक लढले. यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या 11,785 आहे. इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयकडून निवडणूक चिन्ह हिसकावून घेतल्याने अपक्ष उमेदवारांची संख्या गेल्या वेळेपेक्षा 21 टक्क्यांनी जास्त आहे.
ही बातमी वाचा: