SIP : मार्च महिन्यात 51 लाख एसआयपी खाती बंद, शेअर बाजारातील अस्थिरता कारणीभूत, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली
SIP Accounts : मार्च महिन्यात बंद झालेल्या एसआयपी खात्याची संख्या 51 लाखांवर पोहोचली आहे. तर, नव्यानं 40 लाख खाती नव्यानं सुरु झाली.

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 सप्टेंबर 2024 मध्ये उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. ऑक्टोबर 2024 पासून सुरु असलेली सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मधील घसरण सातत्यानं सुरु आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांनी टॅरिफची रणनीती राबवण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा भक्कम बनवण्यासाठी इतर देशांवर आयात शुल्क, परस्पर शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळं जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण आणि अस्थिरता दिसून आली. भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले आहेत. एप्रिल महिन्यात 31575 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री विदेशी गुंतवणूकदारांनी केली. परिणामी भारतीय शेअर बाजारात म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या घटलेय. मार्च महिन्यात तब्बल 51 लाख एसआयपी खाती बंद झाली आहेत.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडियानं जारी केलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात 51 लाख एसआयपी खाती बंद झाली. तर, 40 लाख एसआयपी खात्यांची नोंदणी झाली आहे. याचा प्रमाण पाहिल्यास जेव्हा 100 एसआयपी खात्यांची नव्यानं नोंदणी होते तेव्हा 127 खाती बंद होत आहेत. दरम्यान, जी एसआयपी खाती बंद झाली ती निष्क्रिय असल्यानं देखील बंद करण्यात आली आहेत. त्याचा समावेश देखील 51 लाखांमध्ये आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात देखील एसआयपी खाती मोठ्या प्रमाणावर बंद झाली होती. एसआयपी बंद होण्याचं प्रमाण जानेवारीत 122 टक्के तर फेब्रुवारीत 109 टक्के इतकं होतं. मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये होणारी गुंतवणूक घटली आहे. मार्च महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये 25926 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर, फेब्रुवारी महिन्यात ती गुंतवणूक 25999 कोटी रुपये होती.
मार्च महिन्यात नव्यानं नोंदणी झालेल्या एसआयपी खात्यांची संख्या 40.18 लाख कोटी रुपये होती. तर, फेब्रुवारी महिन्यात ही संख्या 44.56 लाख इतकी होती. फेब्रुवारी महिन्यात 8.26 कोटी एसआयपी खात्यातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक झाली. ती मार्च महिन्यात 8.11 कोटी खात्यांवर आली. एसआयपीमधील असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम मार्च महिन्यात 13.35 लाख कोटींवर पोहोचली आहे. जी फेब्रुवारी महिन्यात 12.37 लाख कोटी रुपये इतकी होती.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























