(Source: ECI | ABP NEWS)
Dhravya Shah : मुंबईचा ध्रव्य शाह वयाच्या 19 व्या वर्षी बनला सीईओ,एआयची समस्या सोडवली, थेट गुगलच्या एआय हेडनं दखल घेतली
Dhravya Shah : मुंबईच्या ध्रव्य शाहच्या प्रोजेक्टला गुगलचे एआय हेड जेफ डीन आणि डीपमाईंडचे लोगन किलपॅट्रिक यांचा पाठिंबा मिळाला आहे.

मुंबई : आजकाल अनेक तरुण शिक्षण आणि करिअर निवडण्याचा विचार करत असल्याचं पाहायला मिळतं. मुंबईच्या 19 वर्षीय ध्रव्य शाह यानं मोठं यश मिळवलं आहे,ज्यामुळं सर्वांचं लक्ष त्यानं वेधलंय. ध्रव्य शाह एका एआय स्टार्ट अपचा सीईओ आहे. शाहला सिलिकॉन व्हॅलीतील दिग्गजांचं समर्थन मिळालं आहे. शाहच्या स्टार्टअपचं नाव सुपरमेमोरी आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून त्यानं 30 लाख डॉलर्सचं फंडिंग मिळवलं आहे. विशेष बाब म्हणजे सुपरमेमोरीला फंडिंग करणाऱ्यांमध्ये गुगलचे एआय हेड जेफ डीन आणि डीपमाइंडचे लोगन किलपॅट्रिक यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. वयाच्या 19 व्या वर्षी ध्रव्य शाहनं मिळवलेलं यश मोठं मानलं जातंय.
Dhravya Shah supermemoryai : सुपरमेमोरी लाँच, एआयच्या मेमरीचा प्रश्न मिटणार
सुपरमेमोरीचा उद्देश एआयची एक समस्या दूर करणं आहे जी आतापर्यंत मोठ्या मॉडेल्स साठी सर्वात मोठं आव्हान राहिलं आहे. साधारणपणे लार्ज लँग्वेज मॉड्यूल खूप स्मार्ट असतात, त्यांच्याकडे खूप डेटा असतो. मात्र, त्यामध्ये दीर्घकाळाच्या मेमरीची उणीव असते. म्हणजेच हे मॉडेल सर्वसाधारणपणे जुनी माहिती लक्षात ठेवू शकत नाहीत. ध्रव्य शाहचं स्टार्टअप सुपरमेमोरी या समस्येवर मात करण्यासाठी बनवलं गेलं आहे. हे तंत्रज्ञान एआय एप्लिकेशनला वेगवेगळ्या सत्रात माहिती लक्षात ठेवण्यास आणि पुन्हा उपयोगात आणण्यास मदत करतं. जर हे तंत्र यशस्वी झालं तर संपूर्ण जगात डिजीटल सिस्टीम्समध्ये काम करणे आणि यूजर एक्सिपिरयन्स बदलण्याची क्षमता ठेवतं.
मुंबईत जन्म, अमेरिकेत कर्तृत्त्वाचा झेंडा
मुंबईत जन्म झालेला ध्रव्य शाह सातत्यानं तंत्रज्ञान आणि नव्या एप्सच्या जगाशी जोडलेला आहे. त्याचे साथीदार आयआयटी सारखी कठीण परीक्षा देण्याच्या तयारीत असताना ध्रव्य नं कोडिंगमध्ये लक्ष घातलं. या दरम्यान त्यानं ट्विटर ऑटोमेशन टूल बनवलं. ते हाइपफ्यूरी नावाच्या प्लॅटफॉर्मला विकलं. त्यानंतर अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यानं नवं आव्हान स्वीकारलं. 40 आठवड्यात नव्या प्रकल्पावर काम करण्याचा संकल्प केला. त्या प्रयोगातून सुपरममोरीचं प्राथमिक रुप समोर आलं ज्याला सुरुवातीला एनी कॉन्टेस्ट म्हटलं जायचं. सुरुवातीला हा एक चॅटबॉट होता जो ट्वीटर बुकमार्क्स सोबत चर्चा करण्याची सुविधा द्यायचा.
























