LIC Share News : एलआयसीच्या शेअर दरात घसरण; गुंतवणुकदारांना 87,500 कोटींचा फटका, बाजार भांडवलात घट
LIC Share News : एलआयसीच्या शेअर दरात होत असलेल्या घसरणीचा फटका गुंतवणुकदारांना बसत आहे. एलआयसीच्या बाजार भांडवलात मोठी घट झाली आहे.
LIC Share News : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनीला (LIC) शेअर बाजारात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेअर बाजारात मोठी संस्थात्मक गुंतवणुकदार असलेल्या एलआयसीला शेअर बाजारातील लिस्टिंगपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. डिस्काउंट दरात लिस्ट झालेल्या एलआयसीच्या शेअर दरात घसरण होत आहे. एलआयसीच्या गुंतवणुकदारांना 87,500 कोटींचा फटका बसला आहे. लिस्टिंगच्या वेळेस बाजार भांडवलानुसार एलआयसी ही पाचवी मोठी कंपनी होती. आता एलआयसीच्या स्थानात घसरण झाली असून आयसीआयसीआय बँकेपेक्षाही कमी बाजार भांडवल झाले आहे.
आज, गुरुवारी एलआयसीच्या शेअर दरात किंचींत घसरण दिसून येत आहे. गुरुवारी एलआयसीचा शेअर 809 रुपयांवर व्यवहार करत होता. बुधवारी एलआयसीचा शेअर 810.55 रुपयांवर बंद झाला होता. बुधवारी या शेअरने 817 रुपयांचा दिवसातील उच्चांक गाठला होता. एलआयसीच्या शेअर दरात होत असलेल्या घसरणीचा परिणाम बाजार भांडवलावरही (Market Cap) झाला आहे. बुधवारी एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 5,12,672 कोटींच्या आसपास झाले. तर, आयसीआयसीआय बँकेचे 5,23,353.87 कोटी रुपयांच्या आसपास आहे. बाजार भांडवल मूल्यानुसार एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सातवी कंपनी झाली आहे.
शेअर बाजारातील गुंतवणुकीतून फायदा
भारतीय शेअर बाजारातून भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) चांगलाच नफा कमावला आहे. एलआयसीने शेअर बाजारातून 42 हजार कोटींचा नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात एलआयसीची ही कमाई झाली आहे. त्याआधी वर्ष 2020-21 मध्ये एलआयसीने 36 हजार कोटींचा नफा कमावला होता.
LIC ही भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक आहे. एलआयसीच्या अखत्यारीत अब्जावधींची मालमत्ता आहे. त्याशिवाय एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणुकदार संस्था आहे. एलआयसीकडून जवळपास 25 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक होते, असे एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार यांनी सांगितले.
या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत एलआयसीने विमा प्रीमियममधून 1,44,158.84 कोटींची कमाई केली. मागील वर्षी या तिमाहीत 1,22,290.6 उत्पन्न मिळाले होते. जवळपास 17.88 टक्क्यांनी प्रीमियमद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे.