(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIC On Investment in Adani Group : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये किती रक्कम गमावली? एलआयसीकडून स्पष्टीकरण जारी
LIC On Investment in Adani Group : अदानी समूहातील कंपनींच्या गुंतवणुकीवर एलआयसीने आपली भूमिका एका पत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे.
LIC On Adani Group Investment : अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गने केलेल्या दाव्यानंतर अदानी समूहातील (Adani Group) कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाल्यानंतर सर्वात मोठा फटका एलआयसीला (LIC) बसला असल्याचे म्हटले जात आहे. मागील दोन दिवस सुरू असलेल्या घसरणीत एलआयसीचे 16,850 कोटींचे (LIC Loss in Share Market) नुकसान झाले. त्यानंतर सातत्याने सामान्य माणसांचे, विमाधारकांचे पैसे बुडाले असल्याचा आरोप सुरू झाला होता. त्यावर आता एलआयसीने आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिले. अदानीतील गुंतवणुकीत (Investment In Adani) फायदाच झाला असल्याचा दावा एलआयसीने केला आहे.
अदानीमुळे एलआयसीला फटका?
अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात झालेल्या घसरणीमुळे एलआयसीला मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ही बाब नाण्याची एकच बाजू असल्याचे एलआयसी अधिकाऱ्याने म्हटले. अदानी समूहाच्या शेअर दरात झालेल्या घसरणीनंतरदेखील एलआयसीने आपल्या गुंतवणुकीवर शुक्रवारपर्यंत 100 टक्के नफा मिळवला होता. एलआयसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एलआयसीने अदानी समूहात एकूण 28 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. शुक्रवारी शेअर बाजारात झालेल्या घसरणीनंतर या गुंतवणुकीचे मूल्य 56 हजार कोटी रुपये इतके होते. याचाच अर्थ अदानी समूहातील गुंतवणुकीवर एलआयसीला शुक्रवारपर्यंत 100 टक्के परतावा मिळाला होता.
अदानी समूहातील कोणत्या कंपनीत एलआयसीची किती गुंतवणूक?
> अदानी एंटरप्रायझेस - या कंपनीमध्ये एलआयसीकडे 4.23 टक्के शेअर्स आहेत. याचाच अर्थ एलआयसीकडे या कंपनीचे 4,81,74,654 शेअर्स आहेत. दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज या कंपनीच्या शेअर दराने अप्पर सर्किट गाठला होता.
> अदानी पोर्टस - या कंपनीमध्ये एलआयसीकडे 9.14 टक्के म्हणजे 19,75,26,194 शेअर्स आहेत. सोमवारी या कंपनीच्या शेअर दरात तेजी दिसून आली होती.
> अदानी ट्रान्समिशन - ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत एलआयसीकडे अदानी ट्रान्समिशनचे 3.65 टक्के शेअर्स होते. याचाच अर्थ एलआयसीकडे 4,06,76,207 शेअर्सची मालकी आहे. सोमवारी या कंपनीच्या शेअर दरात लोअर सर्किट लागला होता.
> अदानी ग्रीन- एलआयसीचा कंपनीतील हिस्सा डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 1.28 टक्के होता. म्हणजेच LIC कडे कंपनीचे 2,03,09,080 शेअर्स आहेत. सोमवारी या कंपनीच्या शेअर दरात 20 टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किट लागला.
> अदानी टोटल गॅस - चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीपर्यंत, अदानी समूहाच्या या कंपनीत LIC चा हिस्सा 5.96 टक्के (6,55,88,170 शेअर्स) आहे. अदानी ग्रुपच्या या कंपनीत आज 20 टक्के लोअर सर्किट लागला.
#LIC pic.twitter.com/eqg1MMvcmo
— LIC India Forever (@LICIndiaForever) January 30, 2023
विमाधारकांच्या हिताला प्राधान्य
एलआयसी ही 66 वर्ष जुनी प्रतिष्ठित कंपनी असून विमाधारक, गुंतवणूकदारांच्या हिताला प्राधान्य दिले जात असल्याचे एलआयसीने म्हटले. एलआयसी आपल्या हिताविरोधात, मूल्याविरोधात पावले उचलणार नसल्याचेही एलआयसीच्या पत्रकात म्हटले आहे.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमीची असते. या बातमीद्वारे शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा)
इतर संबंधित बातम्या: