Supriya Sule : 1500 मिळाले नाही तरी चालतील, पण पिकाला हमीभाव द्या, शेतकरी महिलेची भर सभेत खासदार सुळेंसमोर मागणी
लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) दीड हजार रुपये नाही मिळाले तरी चालतील पण पिकांना हमीभाव (MSP) द्या, भर सभेत शेतकरी महिलेनं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यासमोर केलीय.
Supriya Sule : लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) दीड हजार रुपये नाही मिळाले तरी चालतील पण पिकांना हमीभाव (MSP) द्या, भर सभेत शेतकरी महिलेनं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यासमोर केली आहे. देशात आणि राज्यात महागाई झाली की नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी भरसभेत केला होता. यावर बोलताना एका शेतकरी महिलेनं लाडकी बहिण योजनेचे दीड हजार नको पण शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा, अशी मागणी केली आहे. जळगावमध्ये आयोजीत कार्यक्रमात हा प्रकार घडला.
आमच्या पिकांना दर मिळत नाही
आम्ही सोयाबीन आणि कपाशी पिकं घेतो, पण पिकांना दर मिळत नसल्याची माहिती महिला शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे पारोळा येथे आयोजित महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित महिलांना सुळे यांनी मार्गदर्शन केले. आपल्याला लवकरच विधानसभेचा गुलाल उधळायचा असल्याचेही सुळे म्हणाल्या.
पक्ष आणि चिन्ह ओरबाडून घेणे हा पवारसाहेबांचा घात केला
देशात एक अदृश्य शक्ती आहे, त्यांना हा देश स्वतःच्या मर्जीने चालवायचा आहे, पण हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने नाहीतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो, असेही सुळे म्हणाल्या. आता अनेकजण माफी मागत आहेत, पण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा हा मनाने मोठा असतो. पण माफी मागणारे स्वतःची चूक मान्य करत असतील तर ते कोर्टातील केस मागे घेणार का? असा प्रश्न देखील सुळेंनी उपस्थित केला. सध्या न्यायालयात सुरु असलेली लढाई ही फक्त पक्ष आणि चिन्हाची नाही तर ती नैतिकतेची लढाई आहे. कारण पक्ष आणि चिन्ह ओरबाडून घेणे हा आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींचा घात आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मी मेरिटवर खासदारकीचे तिकिट मागितले, हा माझा गुन्हा आहे का?
एक देश एक निवडणुकीचा नारा देणारे सरकार महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलत आहे. याचा अर्थ सरकार डर रही है, कारण राज्यातील महायुतीचे नेते निष्क्रिय असल्यामुळेच प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्रात यावे लागत आहे. असे असेल तर तो महाविकास आघाडीचा विजय असल्याचे सुळे म्हणाल्या. दोन पक्ष फोडण्याचे देवेंद्र फडवणीस यांना कौतुक वाटत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे सुळे म्हणाल्या. मी पक्षाकडे खासदरकीचे तिकीट सोडून काहीही मागत नव्हते कारण संसदेत पहिला नंबर येत असल्यामुळे मी मेरिटवर खासदारकीचे तिकिट मागितले, तर तो गुन्हा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पक्ष फोडला, पण त्यांनी मागितले असते तर पक्ष चिन्हच काय सगळंच दिलं असतं आणि परत शून्यातून विश्व निर्माण केले असतं, असा आत्मविश्वास देखील सुळेंनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या:
Video : लाडकी बहीण योजना म्हणजे 'व्हेंटीलेटर', ते काढावंच लागेल; अर्थतज्ज्ञांकडून पोस्टमार्टम, सगळंच काढलं