Jalgaon Gold Rates Today:सोन्या-चांदीच्या दरात उसळी, सुवर्णनगरीत नवे उच्चांक! दिवसात 3 हजार वाढले, काय आहे लेटेस्ट दर?
दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांना वाढलेल्या किमतींचा सामना करावा लागत आहे.

Jalgaon Gold Rates Today:देशभरात एकीकडे लग्नसराईचा काळ सुरु असताना सोन्या चांदीच्या दरांनी पुन्हा उसळी मारली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दराने जीएसटीसह तब्बल 1 लाख 36 हजार रुपये तर चांदीने 1लाख 95 हजार रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून दरवाढीची चर्चा सुरू असताना, आज एकाच दिवसात झालेल्या मोठ्या वाढीमुळे ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांचं टेन्शन वाढलं आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम
सोन्या-चांदीच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणे प्रमुख ठरत असल्याचं व्यावसायिक सांगतात. जागतिक पातळीवर गुतंवणूकदार,आणि ग्राहकांचा डॉलरवरचा विश्वास डळमळीत होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकी सुरु केल्या आहेत. याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून, जळगावसारख्या मोठ्या सुवर्ण बाजारात दर झपाट्याने वाढताना दिसत आहेत.
सोने दरवाढीची करणे काय?
1. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण
2. अमेरिकेच्या फेडरल बँकेचे व्याजदर कपात, यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले आहेत. यामुळे सोन्याच्या दरात वाढ झालीय.
एकाच दिवसात मोठी दरवाढ
आज एकाच दिवसात सोन्याच्या दरात सुमारे 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे. कालपर्यंत सुमारे 1 लाख 33 हजार रुपये असलेला सोन्याचा दर थेट 1 लाख 36 हजार रुपयांवर जाऊन पोहोचला. दुसरीकडे चांदीच्या दरातही तब्बल 10 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली असून, चांदीने 1 लाख 95 हजार रुपयांची विक्रमी पातळी गाठली आहे. ही दरवाढ गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक असल्याचं बोललं जात आहे.
दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांना वाढलेल्या किमतींचा सामना करावा लागत आहे. मात्र, दुसरीकडे आधीच सोन्या-चांदीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही दरवाढ दिलासादायक ठरत आहे. शुक्रवारच्या दिवशी सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ दिसून आली. 5 फेब्रुवारी 2026 रोजी एक्सपायर होणारा सोन्याचा वायदा एमसीएक्सवर ₹1,32,275 वर उघडला. व्यापारी दिवसादरम्यान, सोन्याने ₹1,34,966 चा उच्चांक गाठला, जो मागील बंदपेक्षा अंदाजे ₹2.400 ने वाढ दर्शवितो.
पुढील काळात दर आणखी वाढणार?
जळगावच्या सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलर-रुपया विनिमय दर आणि जागतिक आर्थिक घडामोडी पाहता पुढील काही दिवसांतही सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी बाजाराचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा, असा सल्लाही व्यावसायिकांकडून दिला जात आहे.























