IPO : ओयो आयपीओचा आकार निम्म्याने कमी करणार? तर 'दिल्लीवेरी'ने आयपीओ पुढे ढकलला
OYO IPO : ओयो कंपनीकडून आयपीओचा आकार अर्ध्याने करण्याची शक्यता आहे. बाजारातील अस्थिरता वाढल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई : हॉस्पिटॅलिटी फर्म ओयो इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा आकार अर्धा करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ओयोने आयपीओ लॉन्च करण्यासाठी गेल्या वर्षी बाजार नियामक सेबीकडे अर्ज सादर केला होता.
ओयोची मूळ कंपनी Orwell Stage Ltd बाजारातील नुकत्याच झालेल्या घसरणीमुळे त्याचा आयपीओचा आकार निम्म्याने कमी करू शकते, असे सूत्रांनी सांगितले. ओयोची पूर्वी सुमारे $1 अब्जचा आयपीओ आणण्याच्या योजनेत होती. पण आता त्याचा आकार $ 500 दशलक्ष पर्यंत कमी केला जाऊ शकतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओयो 12 अब्ज डॉलरच्या मूळ उद्दिष्टापेक्षा निम्म्याने त्याचे अंदाजे मूल्यांकन कमी करण्याचा विचार करत आहे. ओयोचा आयपीओ योजना रद्द करण्याचा विचार सुरु असल्याची देखील माहिती मिळते आहे. सॉफ्टबँक आणि एअरबीएनबीने गुंतवणूक केलेल्या ओयोच्या आयपीओची बाजारात बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे.
आयपीओ पुढे ढकलण्याची कारणे?
नुकत्याच झालेल्या मार्केट क्रॅशमध्ये अनेक नवीन टेक कंपन्यांचे शेअर्सचे नुकसान झाले होते. त्यामुळे अशा कंपन्याबाबत गुंतवणूकदारांचा उत्साह काहीसा थंडावला आहे. त्याचवेळी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळेही बाजारातील अस्थिरता वाढली असून त्याचाही बाजारातील भावावर परिणाम झाला आहे.
याआधी असे वृत्त आले होते की ओयो हॉटेल्स अँड होम्स आयपीओ द्वारे सुमारे 8,430 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. यामध्ये, 7,000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर कंपनीचे भागधारक आणि गुंतवणूकदार त्यांचे 1,430 कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीसाठी ठेवतील.
दिल्लीवेरीने आयपीओ पुढे ढकलला
दिल्लीवरीने एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी त्याचा जवळपास $1 अब्ज आयपीओ पुढे ढकलला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आयपीओ मधील गुंतवणूकदारांना लक्षणीय प्रमाणात शेअर्स विकण्याच्या योजनेवर शेअर बाजार नियामकाच्या नाराजीनंतर कंपनी आपल्या सूचीकरण योजनेचाही आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सॉफ्टबँक सोबत, कार्लाइल ग्रुप इंक-गुंतवणूक केलेल्या लॉजिस्टिक स्टार्टअपने मार्चपर्यंत लिस्ट करण्याची योजना आखली होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha