Housing Sales In 2022: यंदाच्या वर्षात घर विक्रीचा विक्रम, 2014 मधील उच्चांक मोडला
Housing Sales In 2022: सरत्या वर्षात घर विक्रीचा उच्चांक नोंदवण्यात आला. वर्ष 2022 मध्ये घरांची विक्रमी विक्री झाली.
![Housing Sales In 2022: यंदाच्या वर्षात घर विक्रीचा विक्रम, 2014 मधील उच्चांक मोडला Indias top 7 cities register record housing sales in 2022 record highest house selling after 2014 year Housing Sales In 2022: यंदाच्या वर्षात घर विक्रीचा विक्रम, 2014 मधील उच्चांक मोडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/27/93320fd6344ffc14491b23e8396a31d71672135860990290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Housing Sales In 2022: कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर निवासी रिअल इस्टेट सेक्टरसाठी (Real Estate Sector) 2022 हे वर्ष चांगले ठरले. सरत्या वर्षात घरांची उच्चांकी विक्री झाली असल्याचे समोर आले आहे. वर्ष 2021 च्या तुलनेत सात शहरांमधील घरांच्या विक्रीत (Housing Selling) 54 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. या सात शहरांमधील घरांच्या किंमतीतही 4 ते सात टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
2014 मधील घर विक्रीचा विक्रम मोडीत
एनारॉक या संस्थेने देशातील सात प्रमुख शहरातील 2022 मधील घर विक्रीची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार, 2022 मध्ये सात शहरात एकूण 3 लाख 64 हजार 900 घरांची विक्री झाली आहे. ही विक्री 2021 च्या तुलनेत 54 टक्क्यांनी अधिक आहे. वर्ष 2021 मध्ये दोन लाख 36 हजार 500 घरांची विक्री करण्यात आली होती. त्याआधी वर्ष 2014 मध्ये 3 लाख 43 हजार घरांची विक्री झाली होती. आतापर्यंतचा हा सर्वाधिक घर विक्रीचा उच्चांक आहे. गृहकर्ज दरात वाढ, जागतिक पातळीवरील घडामोडी, या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेट सेक्टरसाठी हे वर्ष चांगले लाभदायी ठरले असल्याचे एनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले. या सात शहरांमध्ये एनसीआर, मुंबई महानगर, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता या शहरांचा समावेश आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात घरांची सर्वाधिक विक्री
मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक घरांची विक्री झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. मुंबई महानगर क्षेत्रात एकूण 1,09,700 घरांची विक्री झाली आहे, त्यानंतर दिल्ली NCR मध्ये आहे. 2022 मध्ये दिल्ली NCR मध्ये एकूण 63,700 घरांची विक्री झाल्याचे नोंदवण्यात आले. एनारॉकने दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये एकूण 3,57,600 निवासी घरे लाँच करण्यात आली आहे. वर्ष 2021 मधील 2,36,700 युनिट्सपेक्षा 51 टक्के अधिक आहे. तथापि, 2022 मध्ये नवीन घरांचे लाँचिंग 2014 च्या तुलनेत कमी आहे. मुंबई महानगर प्रदेश आणि हैदराबादमध्ये सर्वाधिक निवासी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती.
45 टक्के घरांची किंमत 80 लाखांहून अधिक
आकडेवारीनुसार, नव्या निवासी घरांमध्ये 35 टक्के घरांच्या किंमती या 40 ते 80 लाखा दरम्यान आहेत. 28 टक्के घरांच्या किंमती 80 लाख ते 1.5 कोटींहून अधिक आहे. तर, 17 टक्के घरांची किंमती या 1.5 कोटींहून अधिक आहे. एनारॉकनुसार, एनसीआर क्षेत्रात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)