Indian Railway : भारतीय रेल्वेचा दणका, 3.03 कोटी फेक खाती बंद, IRCTC वरील एका दिवसातील नव्या खात्यांची संख्या 1 लाखांवरुन 5 हजारांवर
IRCTC : भारतीय रेल्वेनं प्रवास करताना तिकीट बुक करायचं असल्यास आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर खातं उघडावं लागतं. रेल्वेनं गेल्या काही दिवसात 3.03 कोटी खाती बंद केलेत.

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेनं आयआरसीटीसी वेबसाईटवरुन बुक केल्या जाणाऱ्या तिकिटांबाबत नियम कडक केले आहेत. आधार प्रमाणीकरण सारख्या उपाययोजना गेल्या काही दिवसात करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या नव्या धोरणामुळं वेबसाईटवर नव्यानं उघडल्या जाणाऱ्या खात्यांची संख्या कमी झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एका दिवसात एक लाख नवी खाती आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर उघडली जायची त्याची संख्या आता 5000 वर आल आहे. रेल्वेनं 3.03 फेक खाती बंद केली आहेत. तर, 2.7 कोटी यूजर आयडी निलंबित केले आहेत.
3.03 कोटी फेक खाती बंद
भारतीय रेल्वेनं आयआरसीटीसी वेबसाईटवरील फेक खात्यांवर कारवाई करत 3.03 कोटी बंद केली आहेत. याशिवाय संशयास्पद अॅक्टिव्हिटी आढळल्यानं 2.7 कोटी यूजर आयडी तात्पुरते निलंबित करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय रेल्वेनं ट्रेन तिकीट बुकिंगमधील फेक खाती बंद केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याचं म्हटलं. तिकीट बुकिंगमधील सुधारणांपूर्वी एका दिवसाला आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नव्यानं उघडल्या जाणाऱ्या खात्यांची संख्या 1 लाखांवर गेली होती. ती संख्या आता पाच हजारांवर आल्याचं त्यांनी सांगितलं.
सर्व प्रवाशांना सहजपणे त्यांच्या खऱ्या आणि वैध यूजर आयडीवरुन तिकीट बुक करता येईल अशा पद्धतीच्या सुधारणा रेल्वे तिकीट बुंकिंग यंत्रणेत कराव्यात याची दक्षता रेल्वे अधिकऱ्यांनी घ्यावी, असं रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये स्थानिक खाद्य पदार्थ द्यावेत, असंही अश्विनी वैष्णव म्हणाले. यामुळं त्या प्रदेशाच्या संस्कृती आणि पदार्थांचं मह्त्व वाढेल, यामुळं प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव देखील चांगला राहिल, अशा सूचना अश्विनी वैष्णव यांनी दिल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं.
दरम्यान, 1 जुलै 2025 पासून ज्या यूजर्सची खाती आधार वेरिफाय आहेत त्यांनाच तात्काळ तिकीट बुकिंग करता येतं. याशिवाय 28 ऑक्टोबर 2025 पासून आधार प्रमाणित खातेधारकांना आरक्षित तिकीट बुकिंगच्या पहिल्या दिवशी सकाळी 8 ते 10 वाजता तिकीट बुकिंग करण्याची सुविधा देण्यात आली आहे. रेल्वेकडून सामान्य प्रवाशांना रेल्वे तिकीट आरक्षित करता यावं म्हणून प्रयत्न केले जात आहेत.
तात्काळ तिकीट बुकिंगसाठी काही सॉफ्टवेअर तयार झाल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यातून माहिती भरुन तिकीट बुक केली जात असल्यानं प्रवाशांना तात्काळ तिकीट बुकिंग करता येत नव्हती. त्यावर पर्याय म्हणून रेल्वेनं काही मार्गांवर काऊंटरवरील तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी बंधनकारक केला आहे. त्याचा प्रवाशांना फायदा होतो का ते लवकरच समजेल.























