(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nithin Kamath: अब्जाधीश नितीन कामथ यांना किराणा दुकानावर मिळाला आयुष्याचा 'हा' मंत्र!
Nithin Kamath Inspirational Story: 'झिरोधा'चे सीईओ नितीन कामत यांना आयुष्यात आनंदी राहण्याचा मंत्र सापडला, तोही एका किराण्याच्या दुकानात.
Nithin Kamath Inspirational Story: आपण दीर्घायुष्यी जगावं आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रकृती चांगली राहावी, अशी इच्छा प्रत्येकाला असते. अनेक वेळेस म्हटले जाते की, पैशांच्या जोरावर तुम्ही आनंद खरेदी करू शकत नाही आणि दीर्घायुष्यीदेखील होऊ शकत नाही. पण दीर्घायुष्यी होण्यासाठी आणि आनंदी राहण्याचा फॉर्म्युला काय? अनेकांना हा प्रश्न सतावतो. तुम्हालादेखील हा प्रश्न सतावत असेल तर युवा अब्जाधीश नितीन कामत (Nitin Kamath) यांच्या उत्तराने तुमचं समाधान नक्की होईल.
पैशांनी मिळत नाही आनंद
नितीन कामत हे अपरिचित नाव नाही. झिरोधा अॅप हे शेअर बाजारातील (Zerodha App Share Market) गुंतवणुकदारांमध्ये लोकप्रिय आहे. नितीन कामत हे त्याच झिरोधाचे सीईओ (Zerodha CEO) आहेत आणि त्यांची सध्याची एकूण संपत्ती सुमारे 270 दशलक्ष डॉलर्सच्या घरात आहे. मात्र, कोट्यवधींची ही संपत्तीही नितीन यांना यशस्वी जीवनाचा मंत्र देऊ शकली नाही. त्याला हा मंत्र एका किराणा दुकानात मिळाला. याचा किस्सा स्वत: नितीन कामत यांनी शेअर केला आहे.
सगळ्यात मोठी संपत्ती कोणती?
प्रोफेशनल सोशल नेटवर्क लिंक्डइनवर नितीन कामत यांनी सांगितले की, समाधान हीच तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. काही प्रमाणात तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्गदेखील मिळतो. ही बाब नितीन कामत यांनी आपले सासरे शिवाजी पाटील यांचे उदाहरण देऊन सांगितले. नितीन कामत यांचे सासरे शिवाजी पाटील हे भारतीय लष्करात होते. कारगिल युद्धात त्यांनी आपली बोटं गमावली. त्यानंतर लष्करातून ते निवृत्त झाले आणि बेळगावात एक किराणा स्टोअर चालवू लागले.
सासऱ्यांकडे पाहून घेतला बोध
नितीन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 70 वर्षाचे झाले तरी ते दररोज स्थानिक बाजारात जातात आणि आपल्या दुकानासाठी सामान खरेदी करतात. त्यांनी कधीही आपलं काम बंद केले नाही. या उलट त्यांची मुलगी म्हणजे नितीन यांची पत्नी सीमा हीदेखील नोकरी करू लागल्यानंतर त्यांनी दुकान बंद केले नाही. मी त्यांनी कधीही कोणत्या गोष्टीची इच्छा बाळगताना अथवा तक्रार करताना पाहिलं नाही. युद्धात आपली बोटं गमावल्याचे दु:खही त्यांच्या चेहऱ्यावर नाही, असेही नितीन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
Being content is the only way to true freedom. A person who embodies this is my father-in-law, Shivaji Patil
— Nithin Kamath (@Nithin0dha) May 8, 2023
He was in the Indian Army & voluntarily retired as a Havaldar after losing his fingers to frostbite during the Kargil War. He started a grocery shop in Belgaum after. 1/5 pic.twitter.com/4svEqcQLy8
आनंदी आणि दीर्घायुष्यी राहण्याचा फॉर्म्युला
Zerodha सीईओ नितीन कामत यांनी सांगितले की, दीर्घायुष्य कसं जगायचं किंवा शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य कसं चांगलं जगायचं याचा विचार करायचो. आता सासऱ्यांच्या किराणा दुकानात जाऊन त्याचा शोध पूर्ण झाला आहे. नितीन सांगतात की, आनंदी राहण्याचा मंत्र म्हणजे समाधानी राहा आणि कधीही मानसिक आणि शारीरिक काम करणे थांबवू नये. या वस्तू पैशाने विकत घेता येत नाही आणि त्याचे सासरचे किराणा दुकान हे त्याचे उदाहरण आहे.