कोळसा विकून सरकार मालामाल, फक्त 4 महिन्यात कमावले 20,000 कोटी रुपये, कोळसा उत्पादनात मोठी वाढ
कोळशाच्या विक्रीतून सरकारनं मोठे पैसे कमावले आहेत. गेल्या चार महिन्यांत सरकारनं कोळसा विक्रीतून 20,000 कोटी रुपयाहून अधिक रुपये सरकारी तिजोरीत आणले आहेत.
Coal News : कोळशाच्या विक्रीतून सरकारनं मोठे पैसे कमावले आहेत. गेल्या चार महिन्यांत सरकारनं कोळसा विक्रीतून 20,000 कोटी रुपयाहून अधिक रुपये सरकारी तिजोरीत आणले आहेत. हा पैसा सरकारी कोळसा कंपनी कोल इंडिया लिमिटेडने मिळवला आहे. दरम्यान, देशात कोळशाच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुं विक्रीत देखील वाढ झाली आहे.
देशातील 80 टक्के कोळशाचे उत्पादन कोल इंडिया करते
कोळशाने गेल्या 4 महिन्यांत (एप्रिल-जुलै) मोदी सरकारच्या खात्यात एकूण 20,071.96 कोटी रुपये जमा केले आहेत. सरकारी मालकीच्या कोल इंडिया लिमिटेड (CIL) च्या तिजोरीतील योगदान या कालावधीत 2.06 टक्क्यांनी वाढले आहे. कोल इंडिया लिमिटेडने वर्षभरापूर्वी याच कालावधीत सरकारी तिजोरीत 19,666.04 कोटी रुपयांचे योगदान दिले होते. देशातील 80 टक्के कोळशाचे उत्पादन कोल इंडिया करते. कोळसा मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. कोल इंडिया देशातील सर्व पॉवर हाऊसना कोळसा विकते. त्यातून मिळणाऱ्या कमाईचा काही भाग सरकारी खात्यात जमा करते.
जुलैमध्ये कोल इंडियाने सरकारला किती पैसे दिले?
जुलैमध्ये कोल इंडियाने सरकारला दिलेली एकूण रक्कम 4,992.48 कोटी रुपये झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 4789.42 कोटी रुपये होते. रॉयल्टी, जीएसटी, कोळशावरील उपकर आणि इतर शुल्क कोल इंडियाद्वारे केंद्र आणि राज्य सरकारांना दिले जातात. कोळसा उत्पादनातून केंद्र आणि राज्य सरकारला भरीव महसूल मिळतो. आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या चार महिन्यात, कोल इंडियाने झारखंड सरकारला सर्वाधिक 4,417.12 कोटी रुपये दिले आहेत. यानंतर, ओडिशा सरकारला 4,319.67 कोटी रुपये, छत्तीसगडला 3,950.41 कोटी रुपये, मध्य प्रदेशला 3,526.27 कोटी रुपये आणि महाराष्ट्राला 2,086.35 कोटी रुपये दिले आहेत.
देशात कोळशाचे उत्पादन वाढले
देशातील कोळसा उत्पादनाची आकडेवारीही कोळसा मंत्रालयाने जारी केली आहे. त्यानुसार एप्रिल ते 25 ऑगस्ट दरम्यान देशातील कोळशाचे उत्पादन 7.12 टक्क्यांनी वाढून 37 कोटी 6.7 लाख टन झाले आहे. वर्षभरापूर्वी याच काळात 34 कोटी 60.2 लाख टन कोळशाचे उत्पादन झाले होते. चालू आर्थिक वर्षात, 25 ऑगस्ट 2024 पर्यंत एकूण कोळशाचा उपसा 39 कोटी 70.6 लाख टन होता, जो वर्षभरात 5.48 टक्के वाढ दर्शवतो. ऊर्जा क्षेत्राला पाठवल्या जाणाऱ्या कोळशाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 31 कोटी 34.4 लाख टनांवरून 32 कोटी 59.7 लाख टन झाले आहे. त्याचवेळी, कोल इंडियाने चालू आर्थिक वर्षात 838 दशलक्ष टन कोळशाच्या उत्पादनाचे लक्ष्यही ठेवले आहे.
महत्वाच्या बातम्या:
देशात विजेच्या मागणीत प्रचंड वाढ, औष्णिक प्रकल्पात कोळशाचा साठा किती?