Gold Rate Today : 24 तासात सोन्याच्या दरात 1200 रुपयांची वाढ, जीएसटीसह तोळ्याचा भाव तब्बल...
Gold Rate Today : जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 1200 रुपयांनी वाढले आहेत. दहा ग्राम शुद्ध सोन्याचा दर आता जीएसटीसह 56 हजार रुपयांच्या पार गेला आहे.
Gold Rate Today : जागतिक पातळीवर सोन्याच्या (Gold Rate) दरात मोठी वाढ झाल्याचा परिणाम जळगावच्या (Jalgoan) सुवर्णनगरीतही पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 1200 रुपयांनी वाढले आहेत. दहा ग्राम शुद्ध सोन्याचा दर आता जीएसटीसह (GST) 56 हजार रुपयांच्या पार गेला आहे.
जळगावची सुवर्णनगरी ही सोन्याच्या बाजारपेठेसाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी केवळ जळगावमधूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून ग्राहक सोन्याची खरेदी करत असतात. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात झालेला बदलाचा परिणाम (दर वाढ अथवा दर कपात) जळगावच्या सुवर्णनगरीतही पाहायला मिळतो.
24 तासात सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी वाढ
सध्या जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असल्याने जळगावमध्येही त्याचा परिणाम दिसत आहे. म्हणून दहा ग्राम शुद्ध सोन्यासाठी 54 हजार 775 रुपये तर जीएसटीसह हेच दर 56 हजार 392 रुपये इतक्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. गेल्या चोवीस तासात हे दर बाराशे रुपयांनी वाढले आहेत. दोन दिवसापूर्वी हेच दर जीएसटीसह 54 हजार 800 रुपये होते.
...अन् गुंतवणूकदार सोन्याकडे वळले
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदराचा परिणाम म्हणजे सोन्याच्या दरात झालेली दरवाढ. अमेरिकन फेडरल बँकेने आपल्या व्याजदरात घट केल्याने गुंतवणूकदार हे सोन्याकडे वळले आहे. यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आणि त्यामुळेच दरातही वाढ झाल्याचं सांगितलं जातं आहे. येत्या 24 तासात दरात आणखी मोठ्या प्रमाणत होऊ शकते किंवा मोठी घट होऊ शकते, असा अंदाज सोने व्यवसाय करणाऱ्यांनी व्यक्त केला आहे
दरवाढीचा ग्राहकांवर परिणाम नाही, खरेदीसाठी गर्दी
दरम्यान सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असली तरी ग्राहकांवर त्याचा परिणाम झाला नसल्याचं पाहायला मिळत आहे. या वाढत्या दरातही ग्राहक मोठ्या संख्येने ग्राहक सोने खरेदीसाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे सध्या सुरु असलेली लगीनसराई आणि दुसरे म्हणजे सोन्याच्या दरात अजून वाढ होण्याचा अंदाज असल्याने आजच सोनं खरेदी करणे. त्यामुळे सोन्याच्या पेढ्या ग्राहकांनी फुलल्याचं दिसत आहे.
भारतीयांकडून सोन्यातील गुंतवणुकीला प्राध्यान्य
सण-उत्सवात सोने खरेदी करणं शुभ समजलं जातं. तर लग्नाच्या कार्यक्रमातही सोन्याची मागणी अधिक वाढते. काळ कोणताही असो सोन्यातील गुंतवणुकीला भारतीयांकडून कायमच प्राधान्य दिलं जातं. परिणामी मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ होते.