(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Price: जळगावात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ; गेल्या 24 तासात 700 रुपयांची वाढ, प्रतितोळा दर 63 हजारांच्या पार
Gold Price Hike : गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे.
Gold Price Hike: देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भावही (Gold Price) कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन लगीन सराई आणि साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जळगावात सोन्याच्या किंमतींने 63 हजारांवर उसळी घेतली आहे. त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. सोन्याचे भाव 63300 रुपयांवर पोहचले आहेत. जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकांचे व्याज धोरण आणि बँक तोट्यात गेल्याच्या घटनांतून अनेक गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचा पाहायला मिळत आहे.
ऐन लग्न साराईच्या तोंडावर ही दर वाढ झाल्याने सर्व सामान्य ग्राहकाच्या आवाक्याबाहेर सोने गेल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदीचे प्रमाण कमी केल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात होत असलेली वाढ पाहता आणि अजूनही सोन्याचे वाढण्याची शक्यता आहे. अनेक ग्राहकांनी गुंतवणूक म्हणून या वाढत्या दरात ही सोने खरेदी करणे देखील पसंत केले आहे. सोन्याची गुंतवणूक ही कधीही फायदेशीर असल्याचं दावा करत या ग्राहकही वाढत्या सोन्याच्या दरात खरेदीचे समर्थन केल्याचे पाहायला मिळत आहे.
अमेरिकन फेडरल बँकेने आपल्या व्याजविषयक धोरणात जे काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे ते पाहता गुंतवणूक दाराना बँकेत पैशांची गुंतवणूक करण्यापेक्षा सोन्यात गुंतवणूक करणे हे सोईचे आणि सुरक्षित वाटत आहे. अनेकांनी सोन्याच्या गुंतवणुकीकडे आपला कल वाढवल्याने जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय भारतात आगामी काळात येत असलेले सण आणि लगीनसराई या मुळे मोठी मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचं सोने व्यावसायिक सांगत आहेत. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात सातशे रुपयांची मोठी वाढ होऊन सोन्याचे दर हे जीएसटीसह 62800 वरून एकदम 63300 रुपयांवर जाऊन पोहचले आहे. सोन्याच्या दराचा विचार करता आज पर्यंतचा हा सर्वाधिक सोन्याचा भाव असल्याचं मानल जात आहे.