Gold Price : सोन्याचे दर पुन्हा 1 लाख रुपयांच्या पुढे जाणार का? 'या' अमेरिकन एजन्सीने केली मोठी भविष्यवाणी
सध्या सोन्याचे दर (Gold Price) सातत्यानं कमी जास्त होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे.

Gold Price : सध्या सोन्याचे दर (Gold Price) सातत्यानं कमी जास्त होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करावी की नको असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात येत आहे. दरम्यान, प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 1 लाख रुपयांवर गेला होता. मात्र, त्यामध्ये सध्या घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या पुढे जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
येत्या काळात सोन्याच्या किमती पुन्हा एकदा विक्रमी वेगाने वाढू शकतात. यावर, अमेरिकन एजन्सी जेपी मॉर्गनने भाकित केले आहे. 2026 च्या मध्यापर्यंत सोन्याची किंमत प्रति औंस 4000 डॉलर्स ओलांडू शकते. अलिकडच्या काळात, बँकेने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, मंदीच्या वाढत्या चिंता आणि अमेरिकेने लादलेले उच्च शुल्क आणि अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात.
जेपी मॉर्गनने केली मोठी भविष्यवाणी
जेपी मॉर्गनने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 2025 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत सोन्याचा सरासरी दर प्रति औंस 3675 डॉलर असेल. दुसरीकडे, जर गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँकांकडून मागणी मजबूत राहिली तर किंमत आधीच 4 हजार डॉलर्सच्या पातळीला स्पर्श करु शकते. गोल्डमन सॅक्सनेही आता यावर अधिक तेजीची भूमिका स्वीकारली आहे. ज्याने अलीकडेच 2025 च्या अखेरीस प्रति औंस 3300 डॉलरवरुन 3700 डॉलरपर्यंत आपला अंदाज वाढवला आहे. यावर, बँकेचे म्हणणे आहे की, अत्यंत परिस्थितीत, पुढील वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत 4500 डॉलरच्या पुढे म्हणजेच 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
व्याजदरही वाढण्याची शक्यता
जेपी मॉर्गनच्या या अंदाजामागील मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँकांकडून सतत होणारी खरेदी वाढणे. यावर, बँकेला आशा आहे की या वर्षी सोन्याची मागणी सरासरी प्रति तिमाही 710 टन राहील. त्याच वेळी, जेपी मॉर्गनने त्यांच्या अंदाजांमध्ये संभाव्य नकारात्मक जोखीम देखील दर्शविल्या आहेत. जर सरकारी बँकांची मागणी कमकुवत झाली तर व्याजदर देखील वाढू शकतात.
आज सोन्याच्या दरात वाढ
आज सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. भू-राजकीय तणावात वाढ होत आहे आणि त्यासोबतच अमेरिकेच्या आर्थिक वाढीबाबत अनिश्चितता आहे. त्याच वेळी, डॉलरमध्येही कमकुवतपणा दिसून आला आहे. त्यामुळे आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 490 रुपयांनी वाढून 98060 रुपयांवर पोहोचला आहे.























