Global Health IPO : मेदांता हॉस्पिटल चालवणाऱ्या ग्लोबल हेल्थ कंपनीचा IPO सुरू, गुंतवणूक करण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या
मेदांता हॉस्पिटल चालवणाऱ्या ग्लोबल हेल्थ कंपनीचा IPO सुरू झाला आहे. या IPO मध्ये तुम्ही सात नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करु शकता.
Global Health IPO GMP : मेदांता हॉस्पिटलची (Medanta Hospital) साखळी चालवणाऱ्या ग्लोबल हेल्थची सध्या ग्रे मार्केटमध्ये (Gray Market) चांगली स्थिती आहे. सध्या कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम 33 रुपये आहे. तो सर्वात चांगला मानला जात आहे. ग्लोबल हेल्थ कंपनीचा IPO कालपासून सुरु झाला आहे. या IPO मध्ये तुम्ही सात नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करु शकता. या IPO च्या माध्यमातून कंपनी 500 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करत आहे. यासोबतच 1 हजार 706 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जाणार आहेत. कंपनी 11 नोव्हेंबर रोजी समभागांचे वाटप करणार आहे. त्याच वेळी, त्याची अंतिम सूची 16 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केली जाणार आहे.
ग्रे मार्केटमध्ये कंपनीची स्थिती मजबूत दिसत आहे
मेदांता हॉस्पिटल चालवणारी कंपनी ग्लोबल हेल्थची ग्रे मार्केटमध्ये सध्या चांगली स्थिती आहे. सध्या कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम (ग्लोबल हेल्थ IPO GMP) 33 रुपये आहे. केवळ जीएमपीच्या आधारे गुंतवणूक करु नका, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कंपनीची आर्थिक कामगिरी पाहूनच गुंतवणूक योजना बनवावी असे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
उर्वरित IPO तपशील जाणून घ्या
तुम्ही या IPO मध्ये तीन ते सात नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करु शकता. कंपनीने IPO ची मूळ किंमत 319 ते 336 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. यासोबत कंपनीच्या शेअर्सचा लॉट साइज 44 शेअर्स असावा असेही सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही रिटेल गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला किमान 14 हजार 784 रुपये गुंतवावे लागतील. त्याचवेळी, शेअरचे दर्शनी मूल्य प्रति शेअर दोन रुपये आहे. कंपनीने IPO मधील 10 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि 75 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवले आहेत. या आयपीओद्वारे उभारलेल्या पैशातून कंपनी आपले जुने कर्ज फेडणार आहे. यासोबतच उर्वरित रक्कम पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे.
ग्लोबल हेल्थ कंपनीविषयी माहिती
ग्लोबल हेल्थ कंपनीने देशभरातील अनेक शहरांमध्ये मेदांता रुग्णालये उघडली आहेत. ज्यात विविध आजारांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. हे रुग्णालय गुरुग्राम, इंदूर, रांची, लखनौ आणि पाटणा येथे मेदांता ब्रँड अंतर्गत आहे. प्रसिद्ध कार्डिओ सर्जन डॉ. नरेश त्रेहान यांनी 2004 मध्ये मेंदांता ब्रँड नावाने हॉस्पिटलची एक साखळी सुरु केली होती. ग्लोबल हेल्थ कंपनीमध्ये जगातील आघाडीच्या खासगी इक्विटी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे.