लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची खरंच छाननी होणार का? आदिती तटकरे यांनी संभ्रम संपवला, थेट सांगून टाकलं!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावरच आता माजी मंत्री आदिती तकटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) नव्याने चर्चेत आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात याच योजनेला केंद्रस्थानी ठेवून महायुतीने आपला प्रचार केला होता. मात्र आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळातून तसेच राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असतानाच आता नवी आणि ठोस माहिती समोर आली आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी पुन्हा होणार नाही, असे राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तकटरे यांनी नेमकं काय सांगितलं?
आदिती तटकरे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. यावेळी बोलताना "लाडकी बहीण योजने जवळपास दोन कोटी 34 लाखाच्या जवळपास महिला लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची स्क्रुटनी होणार नाही. छाननीबाबत चुकीचे वृत्त समोर येत आहे. या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळालेला आहे. या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींबाबतसंबंधित विभाग निर्णय घेईल. पण सध्यातरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही. मात्र मी जेव्हा मंत्री होते, त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जे लाभार्थी आहेत, त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना याआधीच अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
अर्जांची छाननी होणार का? नेमकी काय चर्चा आहे?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना निकषात बसत नसूनही प्रतिमहिना 1500 रुपये लाभ दिला जात आहे, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे तक्रार आलेल्या अर्जांची नव्याने छाननी केली जाणार आहे. तसेच अर्जामध्ये तफावत आढळल्यास, चुकीची माहिती दिली गेली असल्यास अर्ज बाद केला जाईल, असे सांगण्यात येत आहे. यासह अर्जदार महिला सरकारने घालून दिलेल्या नियमांत बसत नसेल, तरीदेखील अर्ज बाद केला जाईल, असे सांगितल जात आहे. पण अद्याप तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे आदिती तकटकरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अर्जांची छाननी करण्याचे सूतोवाच केले होते. तसेच या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ 1500 रुपयांवरून 2100 रुपये केला जाईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली होती. सर्व बाबी तपासून आगामी अर्थसंकल्पात त्यासाठीच्या निधीची तरतूद करण्यावर विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले होते.
Aditi Tatkare Video News :
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?