Inflation : चोर पावलांनी आली महागाई; सामान्यांचे कोलमडले बजेट, वस्तूंचे वजन घटले पण किंमती वाढल्या
Inflation : चोर पावलांनी आलेल्या महागाईमुळे सामान्यांचे बजेट बिघडले आहे.
Inflation : देशात सर्वत्र महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नाहीत. तर दुसरीकडे दैनंदिन जीवनाशी निगडीत वस्तूही महाग होत आहेत. एफएमसीजी कंपन्यांनी दैनंदिन वापराशी संबंधित वस्तूंच्या किमती चोर पावलाने वाढवल्या आहेत. यामध्ये दूध, बिस्किटे, नाश्ता, चहा, कॉफी आणि इतर अनेक खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.
किंमती 20 टक्क्यांनी वाढल्या
एफएमसीजी कंपन्यांनी साबण-टूथपेस्ट सारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत. जानेवारी 2022 मध्ये या वस्तूंच्या किमती तीन ते 20 टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यानंतर ही दरवाढ कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सांगितली जात असल्याचे सांगण्यात आले. परंतु या वर्षी 2023 मध्ये FMCG कंपन्यांनी जास्त मागणी असलेल्या जवळपास सर्व वस्तू महाग केल्या आहेत. लहान मुलांच्या दुधाच्या पावडरच्या 500 ग्रॅमच्या पाकिटाची किंमत पूर्वी 350 रुपये होती. आता त्याचे प्रमाण 400 ग्रॅम करण्यात आले आहे आणि दर देखील 415 रुपये करण्यात आले आहे.
पॅकेट आकारात घट
अनेक गोष्टींची पॅकेट्स दिवसेंदिवस लहान होत आहेत. मात्र, त्यावर जुने दर आकारले जात आहेत. वाढती महागाई आणि पाकिटांचा आकार कमी झाल्याने जनता प्रचंड नाराज आहे. महागाईचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. बिस्किटांच्या पाकिटामध्ये सुमारे 20 टक्क्यांनी घट झाली आहे. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, हात धुण्यासाठी वापरल्या जाणार्या हँड वॉश पाऊचचे वजनदेखील कमी झाले आहे.
दर वाढले पण वजन घटले
पाच महिन्यांपूर्वी एक बिस्किटांचा पुडा हा बाजारात पाच रुपयांना मिळत होता. आजही त्याची किंमत पाच रुपये आहे. मात्र, त्याचे वजन घटले आहे. चिप्स, नमकीनसह सर्व पॅकेज केलेल्या वस्तूंचीही हीच स्थिती आहे. नूडल्सच्या एका पॅकेटचे दर 4 ते 5 रुपयांनी वाढले असून, त्याचे प्रमाण खूपच कमी करण्यात आले आहे. अवघ्या एक ते दोन महिन्यांत महागाई झपाट्याने वाढली आहे.
अशी झाली दरवाढ
वस्तू | सध्याची किंमत | सध्याचे वजन |
पूर्वीचे वजन |
बिस्किट | 5 रुपये | 52 ग्रॅम | 80 ग्रॅम |
चहा पावडर | 60 रुपये | 200 ग्रॅम | 250 ग्रॅम (50 रुपये) |
नमकीन | 10 रुपये | 42 ग्रॅम | 65 ग्रॅम |
वाटाणे | 10 रुपये | 42 ग्रॅम | 65 ग्रॅम |
शेंगदाणे | 10 रुपये | 38 ग्रॅम | 55 ग्रॅम |
कॉफी | 10 रुपये | 5.5 ग्रॅम | 7 ग्रॅम |
मागणी वाढली आणि दरही वाढले
कोरोना महासाथीनंतर देशात FMCG ची मागणी वाढली. रिटेल मार्केटमध्ये FMCG कंपन्यांनी आपली विक्री कायम ठेवण्यासाठी प्रॉफिट मार्जिन कमी केले होते. मात्र, स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर कंपन्यांनी वस्तूंचे वजन कमी करून किंमती हळूवार वाढवल्या असल्याचे सांगण्यात आले.