आठवी पास शेतकऱ्याचं जुगाड, बनवली विजेविना चालणारी पिठाची गिरणी; देशासह परदेशातही मोठी मागणी
एका शेतकऱ्याने पँडल्सवर चालणारी पिठाची गिरणी (flour mill) बनवली आहे. या गिरणीला देशासह परदेशातून देखील मोठी मागणी आहे.
Success Story: अलिकडच्या काळात अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी लाखो रुपयांचं उत्पन्न घेत आहेत. दरम्यान, शेती करत करत अनेक शेतकरी उपयोगात नसलेल्या सामग्रीचे जुगाड करुन वेगवेगळ्या वस्तू तयार करत आहेत. एका अशाच शेतकऱ्याने पँडल्सवर चालणारी पिठाची गिरणी (flour mill) बनवली आहे. या गिरणीला देशासह परदेशातून देखील मोठी मागणी आहे.
गिरणी बनली व्यायामाचे साधन
महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अर्जुन शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. अर्जुन शिंदे यांनी पँडल ऑपरेटेड पिठाची गिरणी केली आहे. ही गिरणी विजेशिवाय चालते. तसेच ही गिरणी व्यायामाचे साधनही बनली आहे. आता या पँडलवरील पिठाच्या गिरणीची मागणी वाढत आहे. दरम्यान, ही पिठाची गिरणी पाहण्यासाठी लांबून लोक येत आहेत. अर्जुन शिंदे यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना काहीतरी नवीन बनवण्याची पूर्वीपासूनच आवड होती. शिंदे यांनी शेतीत वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी देखील बनवल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना मदत करतात. परंतू, सर्वात प्रसिद्ध म्हणजे त्यांची पँडलवरील गिरणी, जी लोकांना खूप आवडते. आता त्यांच्या या गिरणीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
गिरणीची सुरुवात कशी झाली?
अर्जुन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी गावात पावसामुळं विजेचे खांब पडले होते. त्यामुळं काही दिवस वीज नव्हती. घरातील गव्हाचे पीठ संपले होते. कुटुंबातील सर्वजण भातही खात होते. पण दररोज भात खाणेही शक्य नव्हते. गावात दिवे नसल्यामुळे पिठाची गिरणी बंद होती. यानंतर अर्जुन शिंदे यांच्या मनात कल्पना आली की भाकरी खायची असेल तर काहीतरी करावे. मग त्यांनी पँडलवर चालणारी गिरणी बनवली. ज्याची मागणी आता देशाबरोबरच परदेशातही वाढली आहे.
गिरणीचा लोकांना दुहेरी फायदा
पूर्वीच्या काळी आमच्या घरातील वडीलधारी मंडळी हाताने बनवलेल्या जात्यांवर गहू दळत होती. अशा पिठात अनेक प्रथिने होती. त्या पिठालाही चव होती. त्याचप्रमाणे पँडलवरील गिरणीमध्येही पीठ मिळत असल्याची माहिती अर्जुन यांनी दिली. शिंदे यांनी बनवलेल्या गिरणीचा लोकांना दुहेरी फायदा होतोय. त्यांना चांगले पीठ मिळत आहे आणि त्यांचा व्यायामही होत आहे. शिंदे यांनी सायकलची साखळी, लोखंडी पाईप, सायकलची सीट आणि सायकलचे पँडल्स वापरून ही गिरणी तयार केली आहे.
भारतासह परदेशातही मागणी वाढली
चार वर्षांच्या मेहनतीनंतर अर्जुन शिंदे आता ही पँडल गिरणी बाजारात विकत आहेत. अर्जुन शिंदे यांची पँडल गिरणी देशातील विविध राज्यांमध्ये विकली जात आहे. आता या गिरणीला परदेशातूनही मोठी मागणी आहे. वाढती मागणी पाहता ते ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना एक महिन्याचा अवधी मागत आहेत. एका महिन्याच्या आत ते ग्राहकांना पँडल मशिन तयार करुन देत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Tap Water Heater Best : थंडीसाठी बेस्ट जुगाड! थंडीत कुडकुडत भांडी घासणं विसरा; Tap Water Heater घरी आणा अन् गरम पाण्याने सगळी कामं करा