Eternal Shares : सलग दुसऱ्या दिवशी झोमॅटोच्या स्टॉकमध्ये तेजी, शेअर 400 रुपयांचा टप्पा पार करणार? ब्रोकरेज फर्मचा अंदाज
Eternal Share : पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी इटरनलच्या शेअरची खरेदी सुरु केली आहे. ब्रोकरेज फर्म्सनं देखील या स्टॉकला बाय रेटिंग दिलं आहे.

मुंबई : आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल झोमॅटो आणि ब्लिंकीटची पेरेंट कंपनी असलेल्या इटरनलकडूनन जाहीर करण्यात आल्यानंतर स्टॉक तेजीत आहे. सलग दुसऱ्या दिवशी इटरनलच्या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली. दोन दिवसांमध्ये इटरनलच्या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. मंगळवारी बाजार सुरु झाला तेव्हा इटरनलच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार गुंतवणूक केली. इटरनलचा स्टॉक 311.60 रुपयांवर म्हणजेच आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला होता. इंट्रा डे मध्ये तेजी आल्यानं इटरनलचं बाजारमूल्य 3 लाख कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे. इटरनलने कालच पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यानंतर स्टॉकमध्ये 5 टक्के वाढ झाली होती. तर, मंगळवारी म्हणजे स्टॉकमध्ये 15 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर गुंतवणूकादरांनी इटरनलच्या स्टॉक खरेदीसाठी उत्साह दाखवला आहे. हे पाहता ब्रोकरेज फर्मीकडून बाय रेटिंग देण्यात आलं आहे. या स्टॉकचं टारगेट प्राइस 400 रुपये करण्यात आलं आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालकडून इटरनलचं टारगेट प्राइस 310 रुपयांवरुन 330 रुपये केलं आहे. ब्रोकरेज फर्मनं ब्लिंकीटला कंपनीचंग्रोथ इंजिनम म्हटलं आहे. जागतिक फर्म जेफरीजनं इटरनलचं रेटिंग होल्ड वरुन बाय केलं आहे. टारगेट प्राईस 250 रुपयांवरुन 400 रुपये केलं आहे. इटरनल झोमॅटोचा स्टॉक आज 28 रुपयांनी वाढून 299.80 रुपयांवर बंद झाला.
विशेष बाब म्हणजे इटरनलचा नफा आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत 25 कोटी राहिला आहे. पहिल्या तिमाहीतील नफ्यात 90.11 टक्क्यांनी घसरण झाली होती. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 253 कोटी रुपये होता. मात्र, कंपनीचं उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत 70.3 टक्क्यांनी जास्त आहे. इटरनलचं गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत 4206 कोटी रुपये उत्पन्न होतं ते वाढून 7167 कोटी रुपये झालं आहे. इटरनलची क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकीटचा महसूल या वर्षीत 154.7 टक्क्यांनी वाढला आहे. जो वाढून 2400 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान, शेअर बाजारातील सकाळच्या तेजीनंतर आज घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 13.53 अंकांची घसरण होऊन तो 82186.81 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये 29.80 अंकांची घसरण झाली असून 25060.90 अंकांवर पोहोचला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























