EPFO : ईपीएफओकडून व्याज जमा करण्यास सुरुवात, पीएफ पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
EPFO : केंद्र सरकारनं मान्यता दिल्यानंतर ईपीएफओकडून व्याज जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 2024-25 या वर्षासाठी 8.25 टक्के व्याज दिलं जाणार आहे.

नवी दिल्ली : संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कपात करुन दरमहा पीएफ खात्यात जमा केली जाते. पगार पत्रकात ईपीएफसाठी रक्कम कपात करण्यात आल्याचा उल्लेख असतो. तुम्ही नोकरी करत असलेल्या आस्थापनेकडून कपात केलेली रक्कम ईपीएफओकडे जमा केली जाते. ही रक्कम किती जमा झालीय,व्याज किती मिळालं हे अनेकांना कसं पाहायचं हे माहिती नसतं. आर्थिक वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओकडून सध्या व्याज जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ईपीएफओ खातेदारांच्या खात्यात व्याज देखील जमा झालं आहे. अनेकांना पीएफ खात्याचं पासबुक कसं डाऊनलोड करायचं? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
केंद्र सरकारनं मान्यता दिल्यानंतर ईपीएफओकडून 2024-25 साठी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा करण्यात आलं आहे. काही कर्मचाऱ्यांनी त्यांची पासबुक तपासली असता व्याज जमा झाल्याचं दिसून आलं आहे. अनेक जण पीएफ खात्यात व्याज जमा झालं की नाही हे तपासून पाहत नाहीत. मात्र, प्रत्येक महिन्याला पगारातून कपात केली जाणारी रक्कम पीएफ खात्यात जमा होतेय की नाही यासाठी पासबूक पाहणं आवश्यक आहे. याशिवाय व्याज किती जमा झालं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही ई- पासबुक ईपीएफओच्या यूएएन पासबुक या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकता.
पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
पीएफ पासबुक डाऊनलोड करण्यासाठी तुमचा यूएएन क्रमांक सक्रिय असणं आवश्यक आहे. त्यासाठी पहिल्यांदा यूएएन क्रमांक अॅक्टिव्ह करा. यूएएन क्रमांक सक्रिय करण्यासाठी तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर अॅक्टिव्ह यूएएन क्रमांक या पर्यायावरुन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
यूएएन क्रमांक सक्रिय केल्यानंतर तुम्हाला मेंबर पासबूक या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/login या वेबसाईटला भेट दिल्यावर तिथं तुमचा यूएएन क्रमांक आणि पासवर्ड नोंदवा. लॉगीन केल्यानंतर View पासबुक या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्ही आतापर्यंत केवळ एका कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या कंपनीचा पासबुक क्रमांक दिसेल. तो सिलेक्ट करावा लागेल. जर तुम्ही अनेक कंपन्या बदलल्या असतील तर त्या कंपन्यांच्या पासबुक क्रमांक तुम्हाला दिसतील. ते निवडून तुम्ही माहिती घेऊ शकता. याशिवाय तुम्ही वर्ष पर्यायावर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड पासबुक पर्याय दिसेल. तुम्ही पीडीएफ फॉरमॅट प्रकारात पासबुक डाऊनलोड करुन पुढील संदर्भासाठी सोबत ठेवू शकता.
दरम्यान, पीएफ पोर्टलवरील सर्व सेवा मोफत आहेत, याची देखील माहिती असणं आवश्यक आहे.























