Elon Musk: ट्विटरसाठी मस्क यांनी सोडले टेस्लावर पाणी? 4 अब्ज डॉलरच्या शेअर्सची विक्री
Elon Musk: एलन मस्क यांनी ट्वीटर कंपनी खरेदी करण्यासाठी टेस्ला कंपनीचे शेअर्स विकले असल्याची चर्चा सुरू आहे.
Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी ट्वीटर कंपनी खरेदी केल्यानंतर मोठा निर्णय घेतला. मस्क यांनी टेस्ला कंपनीचे जवळपास 4 अब्ज डॉलरच्या शेअर्सची विक्री केली आहे. यूएस सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज कमिशनच्या दस्ताऐवजांतून ही माहिती समोर आली आहे. मंगळवारी, एलम मस्क यांनी टेस्लाचे 19.5 लाख शेअर्सची विक्री केली. याची किंमत जवळपास 3.95 अब्ज डॉलरच्या घरात आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एलन मस्क यांनी ट्वीटर खरेदी करण्यासाठी लागणार निधी हा टेस्लाचे शेअर्स विकून उभा केला आहे. शेअर्स विक्रीनंतर मस्क यांची एकूण संपत्ती 200 अब्ज डॉलरपेक्षाही खाली आली आहे. टेस्लाच्या शेअर्सची किंमत घसरली असून 52 आठवड्यातील नीचांकी दर गाठला आहे. मात्र, तरीदेखील मस्क हे जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक व्यक्ती आहे.
एलन मस्क यांनी आपली इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्सची विक्री ऑगस्टनंतर पहिल्यांदा केली आहे. यूएस सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज कमिशनने मंगळवारी ही माहिती दिली. मात्र, टेस्लाची शेअर विक्री ही पूर्वनियोजित होती का, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. गुंतवणूकदारांनी मस्क यांच्याकडून कंपनीच्या शेअर्सची विक्री होईल असा अंदाज वर्तवला होता.
मस्क यांनी दिले होते संकेत
ऑगस्ट महिन्यात एलन मस्क यांनी टेस्लाच्या शेअर्स विक्रीबाबत माहिती दिली होती. ट्वीटरवर एका फॉलोअर्सच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी म्हटले होते की, सोशल मीडिया कंपनी खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी लागल्यास टेस्लामधील शेअर्सची 'आपत्कालीन विक्री' टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
ट्वीटरमध्ये कर्मचारी कपात
ट्वीटर खरेदी केल्यानंतर एलन मस्क यांनी काही मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ट्वीटरवरील व्हेरिफाइड ब्लू टिक खात्यांसाठी 8 डॉलर शुल्क लागू केले आहे. यामध्ये युजर्सना काही नवीन फिचर्स दिले जाणार आहेत. त्याशिवाय, दुसरीकडे मस्क यांनी कर्मचारी कपात धोरण लागू केले आहे. मस्क यांनी ट्वीटरमधून 50 टक्के कर्मचारी कपात केली आहे. भारतातील 90 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे.