Digital Credit : कर्ज घेणं आणखी सोपं, लवकरच डिजिटल क्रेडिट उपलब्ध होणार; 10 देशांत UPI सेवा होईल सुरु
NRI UPI Service : भारतीयांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. यावर्षी डिजिटल क्रेडिट सेवा सुरु केली जाईल, यामुळे 10 देशांतील अनिवासी भारतीयांनाही UPI सेवा उपलब्ध होईल.
UPI Service Digital Credit : भारतीयांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता कर्ज (Loan) घेणं आणखी सोपं होणार आहे. केंद्र सरकार यावर्षी डिजिटल क्रेडिट (Digital Credit) सेवा सुरु करणार आहे. डिजिटल क्रेडिट सेवेमुळे रस्त्यावरील लहान विक्रेतेही मोठ्या बँकांकडून कर्ज घेऊ शकतील. यामुळे भारतीयांचाच नव्हे तर अनिवासी भारतीयांचा व्यवहार सुखकर होणार आहे. 10 देशांतील अनिवासी भारतीयांनाही UPI सेवा उपलब्ध होईल. केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री (Telecom and IT Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी गुरुवारी (9 फेब्रुवारी) यासंदर्भात माहिती देत मोठी घोषणा केली आहे.
Digital Credit UPI Service : कर्ज घेणं आणखी सोपं
केंद्र सरकारकडून सुरु करण्यात येणाऱ्या नवीन डिजिटल क्रेडिट या सेवेमुळे रस्त्यावरील लहान-मोठे विक्रेते आणि दुकानदारांनाही मोठ्या बँकांकडून कर्ज घेणं सहज शक्य होणार आहे. डिजिटल पेमेंट्स फेस्टिव्हल (Digital Payment Festival) कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, डिजिटल क्रेडिट सेवा UPI सेवेप्रमाणेच असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया' व्हिजन अंतर्गत ही विकासाची मोठी संधी आहे.
In 2023, a major focus would be on complete rollout of the Digital Credit System. I request NPCI (National Payments Corporation of India) to take lead. You made UPI system, you already have the entire building blocks: Electronics & Information Technology Minister Ashwini Vaishnaw pic.twitter.com/I1S81YbXFM
— ANI (@ANI) February 9, 2023
केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, यावर्षी आम्ही डिजिटल कर्ज सेवा सुरू करणार आहोत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) पुढील 10-12 वर्षांत खूप प्रगती करेल. 'डिजिटल पेमेंट्स फेस्टिव्हल' या कार्यक्रमात मंत्री वैष्णव यांनी UPI साठी व्हॉइस-आधारित पेमेंट सिस्टमच्या प्रोटोटाइपचे अनावरण केलं. यावेळी प्रसंगी मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्माही उपस्थित होते, त्यांनी सांगितलं की, UPI हे जागतिक पेमेंट उत्पादनाचं साधन बनेल. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI - National Payments Corporation of India) नेपाळ, सिंगापूर आणि भूतान सारख्या देशांसोबत भागीदारी सुरू केली आहे.
UPI सेवा मातृभाषेतही वापरता येईल
UPI सेवेचा लाभ आता भारतातच नाही तर भारताबाहेरही अनिवासी भारतीयांना (NRIs) होणार आहे. UPI सेवा ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, UAE, UK आणि USA या 10 देशांतील अनिवासी भारतीयांना (NRIs) उपलब्ध असेल. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, 2023 मध्ये डिजिटल क्रेडिट सेवा सुरु होईल. UPI सेवा स्थानिक भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी मिशन भाशिनी - राष्ट्रीय भाषा अनुवाद मिशन आणि डिजिटल पेमेंट्स यांचे एकत्रितपणे प्रयत्न सुरु आहेत. UPI सेवा लवकरच सर्वसामान्यांना त्यांच्या मातृभाषेतही वापरता येईल. याशिवाय आवाजाद्वारे पेमेंट करता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :