जगाची वाटचाल मंदीच्या दिशेने? कच्च्या तेलाची किंमत 75 डॉलरच्या खाली, 2021 नंतर नीच्चांकी पातळीवर
Crude Oil Price: स्वित्झर्लंडच्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक क्रेडिट सुइसमधून गुंतवणूकदारांनी पैसे काढून घ्यायला सुरुवात केल्याने त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होताना दिसत आहे.
Crude Oil Price: आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचं दिसून येतंय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ही 75 डॉलरच्या खाली पोहोचलं असून गेल्या 15 महिन्यांतील ही नीचांकी पातळी आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 5 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूडची किंमतही सुमारे 5 टक्क्यांनी घसरली असून ती 68 डॉलरवर पोहोचली आहे. ब्रेंट क्रूड डिसेंबर 2021 नंतर प्रथमच 75 डॉलरच्या खाली घसरले आहे.
स्वित्झर्लंडच्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक क्रेडिट सुइसमधून (Credit Suisse) गुंतवणूकदारांकडून पैसे काढून घेण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अमेरीकेतील बॅंकिंग सिस्टिमसंदर्भात चिंता वाढली आहे. त्या भीतीपोटी अमेरीका आणि युरोपमध्ये कच्च्या तेलाच्या मागणीत घट झाल्याचं दिसून आलंय. भारत कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करत असल्यानं त्याचा मोठा फायदा होणार आहे. मात्र जागतिक मंदीकडे वाटचालीचं चित्र असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती 95 डॉलरच्या खाली राहिल्यास अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होणार असल्याचं आरबीआयने पतधोरणजाहीर करताना स्पष्ट केलं होतं.
कच्च्या तेलाच्या घसरणीची दोन मुख्य कारणे
कच्च्या तेलाच्या किमती घसरण्यामागे दोन मुख्य कारणे असल्याचं सांगण्यात येतंय. तेलाचा साठा लक्षणीय वाढला असून रशियामधून क्रूड बाजारात आणले जात आहे. दुसरीकडे अमेरिकेतील बँकिंग व्यवस्था संकटात आल्यामुळे जगात मंदीची भीती वाढली आहे.
क्रेडिट सुईसच्या शेअर्समध्ये एकाच दिवशी 30 टक्क्यांची घसरण
स्वित्झर्लंडच्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक क्रेडिट सुईस गेल्या अनेक महिन्यांपासून अडचणीत होती. त्यातील सर्वात मोठी गुंतवणूकदार असणाऱ्या सौदी नॅशनल बँकेने आपला हिस्सा वाढवणार नसल्याचं सांगितलंय. ही बातमी समोर आल्यानंतर क्रेडिट सुइसच्या शेअर्समध्ये 30 टक्क्यांची मोठी घसरण झाली. एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, क्रेडिट सुईसच्या संबंधित या बातमीमुळे जागतिक बाजारपेठेत भीतीचं वातावरण पसरलं आहे. जगातील सर्वात मोठा तेल ग्राहक चीनकडून मागणी वाढेल अशी अपेक्षा पूर्वी होती. परंतु बँकिंग संकटामुळे सध्या ही गोष्ट देखील शक्य नसल्याचं स्पष्ट होतंय. याच कारणामुळे कच्च्या तेलाच्या मागणीतील संभाव्य घसरणीमुळे किमतीतही घसरण होत आहे.
कच्च्या तेलाचा जागतिक साठा 18 महिन्यांच्या उच्चांकावर
2008-2009 मध्ये आलेले आर्थिक संकट, त्यावेळी क्रूडची किंमत अवघ्या 5 महिन्यांत 148 डॉलर वरून 32 डॉलरवर घसरली होती. याशिवाय इंटरनॅशनल एनर्जी एक्सचेंज म्हणजेच IEA ने सांगितले की, क्रूडचे जागतिक स्टोरेज 18 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे. मागणीत घट झाल्यामुळे स्टोरेजमध्ये वाढ झाली आहे.नॉन-ओपेक देशही तेलाचा पुरवठा वाढवत आहेत, त्यामुळे साठाही वाढला आहे आणि कच्च्या तेलाच्या किंमतीवरही दबाव आला आहे.