Cotton Candy : 'बुढ्ढी के बाल'मध्ये कॅन्सरला कारणीभूत केमिकल सापडलं, कॉटन कँडीच्या विक्री आणि उत्पादनावर तामिळनाडूत बंदी
Cotton Candy Ban In Tamil Nadu : तामिळनाडू सरकारने शनिवारी राज्यात कॉटन कँडीच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी घातली आहे.कॉटन कँडीमध्ये कॅन्सर निर्माण करणारे केमिकल सापडल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
चेन्नई: लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आवडीचे असलेल्या कॉटन कँडी (Cotton Candy) म्हणजे 'बुढ्ढी के बाल' वर तामिळनाडू (Tamil Nadu) सरकारने बंदी घातली आहे. कॉटन कँडीमध्ये कॅन्सरला कारणीभूत असलेले रोडामाइन-बी (Rhodamine B) हे केमिकल सापडल्याने तामिळनाडूच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या आधी पद्दुचेरी सरकारनेही कॉटन कँडीवर बंदी घातली होती. त्यानंतर आता तामिळनाडू सरकारने बंदी घातल आहे.
तामिळनाडू सरकारने शनिवारी राज्यात कॉटन कँडीच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
रोडामाइन-बी रसायनाची पुष्टी (Rhodamine B)
कॉटन कँडीवरील बंदीबाबत माहिती देताना तामिळनाडू सरकारचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी शनिवारी सांगितले की, कॉटन कँडीचे नमुने अन्न सुरक्षा विभागाकडून तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये कर्करोगास कारणीभूत असलेल्या रोडामाइन-बी रसायन सापडले आहे.यानंतर राज्यात कॉटन कँडीच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिल्या कारवाईच्या सूचना
आरोग्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अन्न सुरक्षा मानक अधिनियम, 2006 नुसार, विवाह समारंभ आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये रोडामाइन-बी असलेले खाद्यपदार्थ तयार करणे, पॅकेजिंग करणे, आयात करणे, विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा आढावा घेऊन त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुद्दुचेरीतही बंदी लागू
तामिळनाडूपूर्वी, त्याच्या शेजारचे केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीने कॉटन कँडीवर बंदी घातली आहे. कॉटन कँडीमध्ये रोडामाइन-बी आढळल्यानंतर पुडुचेरीने 9 फेब्रुवारी रोजी राज्यात त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तसेच लेफ्टनंट गव्हर्नर तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी राज्यातील कॉटन कँडी विकणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून त्यांचा साठा जप्त करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
काय आहे रोडामाईन बी केमिकल?
रोडामाईन-बी हे पाण्यात विरघळणारे रासायनिक संयुग आहे जे रंगाचे काम करते. चमकदार गुलाबी रंगासाठी ओळखले जाणारे हे रसायन मानवांसाठी विषारी आहे. मानवी शरीरात हे रसायन गेल्यानंतर पेशी आणि ऊतींवर ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ शकतो. सातत्याने त्याचं सेवन केल्यानंतर कर्करोग आणि ट्यूमरचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा :