Share Market : शेअर बाजारासाठी आज 'ब्लॅक मंडे; Sensex 861 अंकांनी घसरला, IT क्षेत्राला मोठा फटका
Stock Market Updates : ऑईल अॅन्ड गॅस आणि एफएमसीजी ही क्षेत्रं वगळता इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाली.
मुंबई : शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा 'ब्लॅक मंडे' ठरला असून गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं. आज शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 861 अंकांची घसरण झाली. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 246 अंकांची घसरण झाली. आज सेन्सेक्समध्ये 1.46 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,972 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,312 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टी इंडेक्सही 710 अंकांनी घसरला असून तो 38,276 अंकांवर पोहोचला आहे. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला.
आज एकूण 1414 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1989 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 205 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज Tech Mahindra, Infosys, Wipro, HCL Technologies आणि TCS या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर Britannia Industries, Maruti Suzuki, Apollo Hospitals, Nestle India आणि Asian Paints या कंपन्यांच्या निफ्टीध्ये वाढ झाली. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली.
ऑईल अॅन्ड गॅस आणि एफएमसीजी ही क्षेत्रं वगळता इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाली. बँका, आयटी, मेटल, सार्वजनिक बँका आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते तीन टक्क्यांची घसरण झाली.
रुपयाची घसरण
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची 9 पैशांनी घसरण झाली आहे. आज रुपयांची किंमत 79.96 रुपये इतकी आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाटचाल आता 80 कडे सुरू आहे.
शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या (Share Market Crash) पडझडीने झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची घसरण झाली होती. तर निफ्टीमध्ये 370 अंकांची घसरण दिसून आली होती. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1069 अंकांच्या घसरणीसह 57,753.61 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 314 अंकांच्या घसरणीसह 17,244.45 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्याच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Britannia- 1.58 टक्के
- Maruti Suzuki- 1.30 टक्के
- Apollo Hospital- 0.86 टक्के
- Nestle- 0.61 टक्के
- Asian Paints- 0.59 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- Tech Mahindra- 4.61 टक्के
- Infosys- 3.93 टक्के
- Wipro- 3.09 टक्के
- HCL Tech- 2.98 टक्के
- TCS- 2.78 टक्के