Cashless Treatment: रस्ते अपघातातील जखमींसाठी आता कॅशलेस उपचार; 4 महिन्यांत सुविधा संपूर्ण देशात होणार लागू
Cashless Treatment for Accidents: रस्ते अपघातातील जखमींसाठी सरकार कॅशलेस उपचार अनिवार्य करणार आहे. ही सुविधा 4 महिन्यांत संपूर्ण देशात उपलब्ध होईल.
Cashless Treatment for Accidents: रस्ते अपघातात (Road Accident) बहुतांश मृत्यू (Death) हे उपचाराला उशीर झाल्यामुळे होतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सरकार लवकरच रस्ते अपघातात मोफत उपचाराची व्यवस्था (Provision Of Free Treatment) करणार आहे. जेणेकरून जखमींना (Injured) लवकरात लवकर मोफत उपचार (Free Treatment) मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील. यासाठी मोटार वाहन कायद्यात (Motor Vehicle Act) यापूर्वीच बदल करण्यात आले होते. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 4.46 लाख रस्ते अपघात झाले, ज्यात 4.23 लाख लोक जखमी झाले आणि 1.71 लाख लोकांचा मृत्यू झाला.
चार महिन्यांत सुविधा सुरू होणार
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (Ministry of Road Transport and Highways) लवकरच या संदर्भात घोषणा करू शकते. येत्या 4 महिन्यांत संपूर्ण देशात ही सुविधा लागू केली जाईल. मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन (Anurag Jain) यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की, रस्ते अपघातांमुळे सर्वाधिक मृत्यू भारतात होतात. मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचाराचा नियम मोटार वाहन कायद्यात समाविष्ट आहे. काही राज्यांमध्ये हा नियम पाळला जातो. पण आता हा नियम संपूर्ण देशात लागू करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण देशात कॅशलेस उपचार प्रणाली लागू करण्याचं आवाहन आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाला केलं आहे.
गोल्डन अवरमध्ये कुठेही उपचार घेणं शक्य
मोटार वाहन कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अपघातात जखमी झालेल्यांवर तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात यावेत. अपघातानंतर पहिल्या काही तासांतच उपचार उपलब्ध झाले तर अनेकांचे प्राण वाचवण्यात आपण यशस्वी होऊ. अपघातानंतरचे पहिले काही तास गोल्डन अवर असतात. त्यावेळी जखमी व्यक्तीला डॉक्टरांकडे नेलं तर त्याला तातडीनं उपचार मिळतात आणि त्याचा जीव वाचतो.
शाळा, महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा अभ्यासक्रम राबवणार
रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी सरकार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा अभ्यासक्रम राबवणार आहे. याशिवाय, भारत एनसीएपी देखील राबविण्यात येत आहे. यामध्ये सीट बेल्ट रिमाइंडर आणि वाहनांमधील तांत्रिक बदल यांचा समावेश आहे.
4 लाखांहून अधिक अपघातात 4.23 लाख जखमी, तर 1.71 लाख लोकांचा मृत्यू
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2022 मध्ये 4,46,768 रस्ते अपघात झाले. त्यापैकी 4,23,158 लोक जखमी झाले आणि 1,71,100 लोकांचा मृत्यू झाला. एकूण रस्ते अपघातांपैकी 45.5 टक्के अपघात दुचाकींमुळे झाले आहेत. यानंतर, कारमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांचा वाटा 14.1 टक्के होता. यामध्ये सर्वाधिक अपघात अतिवेगामुळे झाले असून 1 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रिपोर्टनुसार, सर्वाधिक रस्ते अपघात हे ग्रामीण भागांत झाले आहेत.