Maharashtra Budget 2023 Live : अमरावतीतील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार; अर्थसंकल्पातील महत्त्वाची घोषणा
Ridhapur Marathi Language University : मराठी भाषेतील आद्य साहित्यिक अशी ओळख असलेल्या चक्रधर स्वामींच्या (Chakradhar Swami) नावानं रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.
Marathi Language University: अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभाव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात त्याचं महत्त्वाचं योगदान आहे. रिद्धपूरचं हे महत्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली.
मराठी भाषेतील आद्य साहित्यिक अशी ओळख असलेल्या चक्रधर स्वामींच्या (Chakradhar Swami) नावानं रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ (Marathi Language University) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावं ही मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत होती.
महानुभाव संप्रदायाचे साहित्याला योगदान
मराठीतील पहिला आद्यग्रंथ म्हणून ओळख असलेला लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूरमध्ये उदयास आला. म्हाइंभटानी तो वाजेश्वरी या ठिकाणी लिहिला असल्याची नोंद आहे. मराठी साहित्याला महानुभाव पंथीयांचा मोठा वारसा लाभला असून महानुभाव पंथाशी संबंधित जवळपास 30 हजार ग्रंथ असल्याची नोंद आहे.
रिद्धपुर हे अमरावती जिल्ह्यात असून श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभावपंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी म्हणून ओळखली जाते. या भूमिमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला गेला. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले.त्याचप्रमाणे सहा हजारहून अधिक ग्रंथ या ठिकाणी लिहले गेल्याने या भूमीला विशेष महत्व आहे.
रिद्धपुर हे श्री गोविंदप्रभू, चक्रधर स्वामी, श्री नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांनी वास्तव्य केलेली भूमी आहे. माहीम भट्ट, केशीराज व्यास, महदाईसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांनी याच ठिकाणी मराठी भाषेला झळाळी दिली. समतेचा विचार 13 व्या शतकात याच मातीत जन्मलेल्या गोविंदप्रभुंनी मांडला. चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता, स्त्री दास्य, मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या. आचारधर्माचा आत्मा होऊन बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे श्री चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना रिद्धपुरमध्ये केल्याचे अनुयायी सांगतात.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
- श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार
- विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे
- मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे
- सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये
- राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : 50 कोटी रुपये
- दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : 115 कोटी रुपये
- कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना
- विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : 10 कोटी रुपये
- स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता 50 कोटी रुपयांचा
ही बातमी वाचा: